पोटदुखी, उलटी आणि अतिसाराचा त्रास सुरू झाल्याने भायखळा तुरुंगातील तब्बल ८१ महिला, एक पुरुष कैदी आणि चार महिन्यांच्या बाळाला शुक्रवारी जे.जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले. या सर्वाना पावसाळ्यातील आजारांचा संसर्ग झाल्याचे स्पष्टीकरण जे.जे. रुग्णालयात उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी दिले असून हा संसर्ग नेमका पाण्यावाटे की अन्नावाटे झाला आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

भायखळा तुरुंगात बंदी असलेल्या काही महिलांना गुरुवार रात्रीपासून पोटदुखी आणि अतिसाराचा त्रास होऊ लागला. त्यानंतर तुरुंगातील डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार केले. मात्र सकाळपर्यंत यातील काही महिलांची अवस्था चिंताजनक होऊ लागली. उलटी आणि अतिसाराचे प्रमाण वाढू लागल्याने सकाळी या महिलांना जे.जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले.

सकाळी ९.४०ला पहिली महिला कैदी उलटी आणि अतिसार होत असल्याची तक्रार घेऊन दाखल झाली. त्यानंतर एकामागून एक रुग्णांची रांगच सुरू झाली. दुपारी दीड वाजेपर्यंत रुग्ण येतच होते. सध्या रुग्णालयात या सर्वावर उपचार सुरू असल्याचे जे.जे. रुग्णालयाचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. मुकुंद तायडे यांनी सांगितले.

दाखल होणाऱ्या जवळपास प्रत्येक रुग्णाला उलटी, मळमळ, पोटदुखी आणि अतिसाराचा त्रास होत होता. त्यामुळे या रुग्णांना तात्काळ ग्लुकोज देऊन प्रतिजैविके दिली. सध्या सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असून ४८ तास त्यांना रुग्णालयात ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर प्रकृतीचा आढावा घेऊन तुरुंगात पाठविण्यात येणार असल्याचे रुग्णांवर उपचार करणारे डॉ. शेख यांनी सांगितले.

रुग्णालयात दाखल दोन महिला गर्भवती असून त्यांची स्त्रीरोगतज्ज्ञांनी तपासणी केली आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांची सोनोग्राफी करण्यात येणार आहे. चार महिन्यांच्या अर्भकाची प्रकृती स्थिर असून त्याच्या आईवरही उपचार सुरू आहेत, असे मेडिसीन विभागाच्या प्रमुख डॉ. विद्या नागर यांनी सांगितले.

या घटनेनंतर शुक्रवारी तत्काळ तुरुंगातील पाण्याच्या टाक्या, जलवाहिन्यांची तपासणी, स्वच्छता मोहीम हाती घेतली असून कैद्यांना शुद्ध आणि हवाबंद बाटलीतील पाणी पुरविले जाईल, असे तुरुंग महानिरीक्षक राजवर्धन सिन्हा यांनी  सांगितले. नागपाडा पोलिसांनी घटनेची नोंद घेत पुढील चौकशी आणि तपास सुरू केला आहे.

‘त्या’ गोळ्या भोवल्या?

गुरुवारी आरोग्य विभागाने भायखळा तुरुंगात कॉलरा साथीवर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून औषधे पाठविली होती. काही कैद्यांनी या गोळ्या घेतल्या आणि त्यांना पोटदुखीचा त्रास होऊ लागला. त्यामुळे त्या गोळ्या घेऊ नका, असा निरोप तुरुंग कर्मचाऱ्यामार्फत देण्यात आला. मात्र या गोळ्यांनी उलटी किंवा अतिसाराचा त्रास होण्याची कदापि शक्यता नाही, असा डॉक्टरांचा दावा आहे.

टाकीतील पाणी खराब?

दूषित पाण्यावाटेच या कैद्यांना संसर्ग झाल्याची शक्यता आहे. महिला कैद्यांसाठी असलेल्या पिण्याच्या पाण्याच्या टाकीत संसर्ग झाला असल्याची शक्यता आहे, असे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले. सर्व रुग्णांचे रक्ताचे नमुने प्रयोगशाळेमध्ये पाठविण्यात आले असून त्याचा अहवाल आल्यानंतरच संसर्गाचे नेमके कारण स्पष्ट होईल, असे सांगण्यात आले. पालिकेच्या अधिकाऱ्यांनी कारागृहातील अन्न आणि पाण्याचे नमुने घेऊन तपासणीसाठी पाठविलेले आहेत.