राज्याचे पोलीस महासंचालक आणि मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या अधिनस्थ विविध कार्यालये व आस्थपनांमधील ९३ हजार अस्थायी पदांना ३० सप्टेंबर २०१६ पर्यंत तात्पुरती मुदतवाढ देण्यात आली आहे. त्या आधी पदांचा नवीन आकृतीबंध तयार करुन तो मंजूर करुन घ्यावा, अन्यथा या अस्थायी कर्मचारी-अधिकाऱ्यांचे वेतन रोखले जाईल, असे गृह विभागाने या संदर्भात जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे.
पोलिस महासंचालक यांच्या कार्यालयाच्या आस्थपनांमध्ये २००६ पूर्वीपासून वेळोवेळी अस्थायी पदांची निर्मिती करण्यात आली आहे. सध्या ही संख्या ७६ हजार इतकी आहे. तर अशाच प्रकारे निर्माण करण्यात आलेली १७ हजार अस्थायी पदे मुंबई पोलील आयुक्त यांच्या कार्यालयांशी संबंधित आस्थापनांमध्ये आहेत. या पूर्वी देण्यात आलेली मुदत २९ फेब्रुवारीला संपलेली आहे.
गृहविभागाने ११ मार्चला नव्याने आदेश काढून या पदांना ३० सप्टेंबर १६ पर्यंत पुन्हा मुदतवाढ दिली आहे. मात्र सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ रिक्त असलेली पदे मुदतवाढीतून वगळण्यात आली आहेत. त्याचबरोबरअनावश्यक पदे रद्द करावीत आणि नव्याने आकृतीबंधाचा प्रस्ताव मुंजुरीसाठी उच्चस्तरीय सचिव समितीसमोर सादर करावा, असे आदेशात म्हटले आहे.