News Flash

९९ कोटींचे मोबाइल चोरी

दररोज ८० लाखांपेक्षा जास्त प्रवासी उपनगरीय रेल्वेने प्रवास करतात. गेल्या सहा वर्षांत ५९,९०४ मोबाइल फोन चोरीला गेले आहेत.

(संग्रहित छायाचित्र)

उपनगरीय रेल्वेतील घटना; केवळ ८,८६८ फोन शोधण्यात पोलिसांना यश

मुंबईची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या लोकलमध्ये सध्या सर्वाधिक चोऱ्या मोबाइल फोनच्या असून गेल्या सहा वर्षांत ९९ कोटींहून अधिक रुपयांचे मोबाइल चोरीला गेले आहेत. चोरीला गेलेल्यांपैकी केवळ ८,८६८ फोन शोधण्यात पोलिसांना यश आले आहे.

दररोज ८० लाखांपेक्षा जास्त प्रवासी उपनगरीय रेल्वेने प्रवास करतात. गेल्या सहा वर्षांत ५९,९०४ मोबाइल फोन चोरीला गेले आहेत. या फोनचे मूल्य ९९,४६,९६,९८१ रुपये इतके होते. मुंबई पोलिसांकडून २०१३ पासून मे, २०१८ पर्यंत उपनगरीय गाडय़ांत किती मोबाइल चोरीच्या घटनांची नोंद झाली आहे, तसेच किती किमतीच्या मोबाइल चोरी झाली आहे, पोलिसांनी किती किमतीचे मोबाइल ताब्यात घेतले, याबाबत माहिती घेण्यात आली. लोहमार्ग पोलीस विभागाचे शासकीय माहिती अधिकारी असलेल्या साहाय्यक पोलीस आयुक्तांनी ही माहिती दिली.

यात मुंबईत १ जानेवारी २०१३ पासून डिसेंबर २०१८ पर्यंत एकूण ५९,९०४ मोबाइल फोन चोरीच्या घटनांची नोंद झाली. त्यांचे मूल्य  ९९ कोटी ४६ लाख रुपयांच्या आसपास आहे. यातील केवळ फक्त ८,८६८ मोबाइल मिळाले असून त्यांचे मूल्य १० कोटी इतके आहे. म्हणजे चोरी झालेले फक्त १० टक्के मोबाइल परत मिळाले आहेत.

२०१३ मध्ये १,४६,६४,५७० रुपये किमतीचे १,०४५ मोबाइल चोरीला गेले होते. त्यापैकी फक्त ७१० मोबाइल मिळाले आहे. त्यांची किंमत ७०,४९,४४७ रुपये इतकी होती. तसेच २०१४ मध्ये चोरीचे प्रमाण वाढून १,५१८ (२,१७,९१,६३७ रुपये) इतके झाले. यातले फक्त ८३३ (१,९६,५५,५०९) मोबाइल मिळाले आहेत. २०१५ मध्ये एकूण २,०९२ (३५,४३,७८,८६४) मोबाइल चोरीचे घटनेतील फक्त १,२०१ मोबाइल (१,५९,८४,००१) मिळाले आहेत. तर २०१६ मध्ये एकूण २,००९ (३,८२,७२,८१७) मोबाइल चोरीचे घटनेत फक्त १,२४३ मोबाइल (१,८१,३१,४४७) मिळाले आहे. २०१७ मध्ये मोबाइल चोरीच्या नोंदी वाढल्या. त्यामुळे ही संख्या तब्बल २०,७६४ इतकी गेली. या ३३,९६,०१,५८५ रुपये किमतीच्या मोबाइलपैकी फक्त २३३४ (३,३२,३६,०४५) मोबाइल मिळाले आहेत. २०१८ मध्ये चोरी झालेल्या एकूण ३२,४७६ (५४,४९,२८,४०८) मोबाइलपैकी फक्त २,५१७ मोबाइल (३,९९,४५,६१४) मिळाले आहेत.

ही माहिती घेणारे माहिती अधिकार कार्यकर्ते शकील अहमद शेख यांच्या मते मुंबईत मोबाइल फोन चोरून नेपाळसारख्या देशात विकणारी टोळी कार्यरत आहे. ही चोरी थांबविण्यासाठी विशेष टास्क फोर्स नेमण्याची मागणी त्यांनी केली.

प्रति दिन तीनवरून ८९ वर

२०१३ मध्ये चोरीला गेलेल्या मोबाइलच्या संख्या पाहता त्या वर्षांत दररोज ३ मोबाइल चोरीला गेले होते. २०१४ मध्ये हा आकडा प्रतिदिन ४वर गेला. २०१५ मध्ये प्रतिदिन ६, २०१६ मध्ये ६, २०१७ मध्ये ५७, २०१८ मध्ये ८९ याप्रमाणे मोबाइल चोरीला गेले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 2, 2019 3:19 am

Web Title: 99 crores mobile theft
Next Stories
1 मेट्रो आड येणाऱ्या २५०० वृक्षांचे पुनरेपण
2 शिक्षण, नोकऱ्यांसाठीच स्वतंत्र आरक्षण
3 धनगर समाजाच्या मागण्यांसाठी मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन
Just Now!
X