वाहतूक पोलिसाला मारहाण करणाऱ्या गोरेगावमधील एका व्यवसायिकाला मॅजिस्ट्रेट कोर्टाने एक वर्षाच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. वाहतूक पोलिसाने वन-वे ला चुकीच्या दिशेने गाडी घातल्याने व्यवसायिकाला थांबवलं होतं. यावरुन व्यवसायिकाने वाहतूक पोलिसाला मारहाण केली होती.

न्यायालयाने व्यवसायिक रमेश बडसिवाल यांना सरकारी कर्मचाऱ्याला कर्तव्यापासून रोखल्याप्रकरणी तसंच इजा पोहोचवल्याप्रकरणी दोषी ठरवलं. ‘जर आपल्यावरी आरोप चुकीचे असल्याचं सिद्ध करण्यास आरोपी अपयशी ठरल्यास, पीडित व्यक्तीने दिलेली साक्ष ग्राह्य धरण्यात येईल. पीडित सरकारी कर्मचारी असल्याने त्यांच्या साक्षेला महत्त्व आहे. कारण त्यांना आपल्या पदाची प्रतिष्ठा आणि विश्वासाबद्दल चांगलीच कल्पना असते’, असं न्यायालयाने सांगितलं आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यानेही पोलीस कर्मचाऱ्याच्या जबाबाला दुजोरा दिला असल्याचं न्यायालयाने यावेळी नमूद केलं.

गावदेवी पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा नोंद झाला होता. 17 ऑगस्ट 2015 रोजी दुपारी 4.30 वाजता महेंद्र परदेशी बाबुलनाथ मार्केटला वाहतूक नियंत्रण करत होते. आरोपी रमेश बडसिवाल इनोव्हा कर घेऊन चुकीच्या दिशेने येत होते. यावेळी महेंद्र परदेशी यांनी त्यांना गाडी थांबवण्यास सांगितलं. शिटी वाजवूनही रमेश बडसिवाल यांनी गाडी थांबवली नाही.

गाडीतून उतरल्यानंतर रमेश बडसिवाल यांनी महेश परदेशी यांच्याशी उद्धट भाषेत बोलण्यास सुरुवात केली. इतकंच नाही तर कॉलर पकडून महेश परदेशी यांच्या पोटावर आणि छातीवर मारहाण केली होती.