मुंबईसह उपनगर परिसरात दोन दिवसांत दमदार पावसाने हजेरी लावली. परिणामी भागांमधील रस्त्यांवर पाणी साचल्याने नागरिकांना अडचणींना सामोरे जावे लागले. याच पार्श्वभूमीवर घाटकोपर पश्चिम मधील आज सकाळी ८ वाजेच्या सुमारास घडलेली एक वेगळी घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे ही घटना व्हिडिओमध्ये कैद झाल्याने व व्हिडिओ व्हायरल झाल्याने, त्याबाबत अधिक चर्चा सुरू आहे.

घाटकोपर पश्चिममधील कामा लेन येथील त्रिभुवन मिठाईवाला दुकानाच्या पाठीमागे रामनिवास या जुन्या सोसायटीतील नागरिकांनी तेथील विहिरीवर अर्ध्या भागात आरसीसी बांधकाम करून ती अर्धी विहीर झाकली होती. एवढच नाही तर त्यावर सोसायटीतील रहिवाशी वाहने उभी देखील करतात. दरम्यान, दोन दिवसांमध्ये झालेल्या दमदार पावसामुळे या विहिरीवरील आरसीसी बांधकाम तुटले व विहीर खचल्याने, त्यावर उभी असलेली तेथील रहिवसी पंकज मेहता यांची कार अवघ्या एका मिनिटात पूर्णपणे विहिरीत गेली.

या घटनेची माहिती वाहतूक नियंत्रण कक्षास देण्यात आल्यानंतर स्थानिक घाटकोपर पोलीस ठाण्याचे अधिकारी / कर्मचारी घटनास्थळी हजर झाले होते.

तर,“त्या ठिकाणी एक विहीर आहे, काही नागरिकांनी त्यावर काँक्रीटचा स्लॅब टाकलेला आहे आणि त्यावर वाहनं उभी केली जात आहेत. दमदार पावसामुळे त्या ठिकाणीची जमीन खचल्याने ही घटना घडली,यामध्ये कुणालाही दुखापत झालेली नाही.” अशी माहिती वाहतूक पोलिसाकडून एएनआयला मिळाली आहे.