मुंबईतल्या कबड्डी संघांप्रमाणे, क्रीडा रसिकांच्या आकर्षणाचं केंद्रबिंदू ठरलेल्या आगरी मंडळाच्या द्वितीय श्रेणी कबड्डी स्पर्धेला आज मोठ्या दणक्यात सुरुवात झालेली आहे. विजेत्यांना मिळणाऱ्या आगळ्या वेगळ्या बक्षिसांसाठी ही स्पर्धा मुंबईत प्रसिद्ध आहे. मागच्या वर्षीप्रमाणे यंदाही विजेत्या संघाला माजलेला बोकड तर उप विजेत्या संघाला १० गावठी कोंबड्या बक्षीस स्वरुपात दिल्या जाणार आहे. जय ब्राह्मणदेव आणि छत्रपती शिवाजी मंडळातल्या सामन्याने या स्पर्धेला सुरुवात झाली आहे. २६ एप्रिलपर्यंत ही स्पर्धा प्रभादेवीच्या किरण पाटील क्रीडानगरित भरणार आहे.

गेल्या वर्षी अनेक प्रसारमाध्यांनी आगरी मंडळाच्या या स्पर्धेला प्रसिद्धी दिली. त्यानंतर यंदाच्या स्पर्धेत तब्बल १६ संघांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला आहे. बोकड आणि कोंबडी या अनोख्या बक्षिसांमुळेच आपल्या स्पर्धेला कबड्डी संघाचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं, आगरी कबड्डी महोत्सवाचे आयोजक दिनेश पाटील यांनी सांगितलं.

विजेता आणि उप विजेत्यासह या स्पर्धेत अनेक बक्षिसांची रेलचेल असणार आहे. प्रत्येक दिवशी सर्वोत्तम खेळ करणाऱ्या खेळाडूलाही गावठी कोंबडी बक्षीस म्हणून दिली जाणार आहे. याचसोबत सर्वोत्तम पकड, सर्वोत्तम चढाई, सर्वोत्तम खेळाडू अशा प्रकारचे अनेक पुरस्कार या स्पर्धेत दिले जाणार आहेत. इतकेच नाही तर या स्पर्धेत मध्यांतराला दोन्ही संघातील खेळाडूंना उकडलेली अंडी दिली जाणार आहेत. या स्पर्धेत प्रभादेवीतील संस्कृती, विकास, ओम श्री साईनाथ, गणेशकृपा, दादरमधील बालमित्र, अमर सुभाष,लोअर परळचे भवानीमाता, साई के दिवाने, हिंद केसरी असे द्वितीय श्रेणीतील तगडे संघ जेतेपदाच्या बोकडासाठी आपले कौशल्य पणाला लावतील.