लोकलमध्ये छेड काढणाऱ्याला तरुणीने पाठलाग करुन पोलिसांच्या हवाली केल्याची घटना समोर आली आहे. लोकलमधील सेकंड क्लास डब्यात प्रवास करत असताना 32 वर्षीय आरोपीने तरुणीची छेड काढली. विरोध केला असता मारहाण करत त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र 16 वर्षीय तरुणीने आपल्या मित्रासोबत पाठलाग केला आणि आरोपीला पोलिसांच्या हवाली केलं.

रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणी आपल्या मित्रासोबत दादर स्थानकाहून रात्री 8 वाजून 26 मिनिटांनी टिटवाळ्याला जाणारी लोकल पकडत असताना ओम हरी सिंह याने तिच्या खांद्यावर हात ठेवला. जेव्हा तरुणीने रागाने त्याच्याकडे पाहिलं तेव्हा त्याने तिची छेड काढण्यास सुरुवात केली.

तरुणीने आरडाओरडा केला असता आरोपी गर्दीत नाहीसा झाला. नंतर ट्रेन जेव्हा कुर्ल्याला थांबली तेव्हा आरोपी त्याच डब्यात असल्याचं तरुणीने पाहिलं. मित्राच्या मदतीने तरुणीने त्याला पकडलं. पण ट्रेनमध्ये गर्दी असल्याने कुर्ला आणि घाटकोपरमध्ये ते उतरु शकले नाहीत. अखेर मुलुंड स्थानकात ते उतरले. मुंलुंड स्थानकावर आरोपीने तरुणीच्या मित्राला धक्का दिला आणि पळ काढला.

तरुणीने आरोपीला पकडलं, पण त्याने तिलाही धक्का देऊन पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत गोंधळ पाहून लोकांची गर्दी जमा झाली होती. लोकांनी त्याला चोप देत पोलिसांच्या हवाली केलं. घटना दादर स्थानकावर घडली असल्या कारणाने पोलिसांनी आरोपीला मुलुंडमधून दादरला नेलं. न्यायालयात हजर केलं असता आऱोपीला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.