ट्रॉम्बे पोलीस सध्या उज्जैन येथील एका भोंदूबाबाचा शोध घेत आहेत ज्याने मुलाचा कॅन्सर बरा करण्याचा बहाणा करत चेंबूर येथील 41 वर्षीय महिलेवर बलात्कार केला. इतकंच नाही तर त्याने दांपत्याकडून 3.5 लाख रुपये लाटले आहेत. कॅन्सरग्रस्त 10 वर्षीय मुलाचा गतवर्षी मृत्यू झाला आहे. दांपत्याने पोलीस ठाण्यात तक्रार केल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. महत्त्वाचं म्हणजे दांपत्य उच्चशिक्षित असून पती शास्त्रज्ञ आहे. त्यांचा धार्मिक गोष्टींवर विश्वास आहे.

‘2017 मध्ये मुलाला कॅन्सर असल्याचं निष्पन्न झाल्यानंतर दांपत्याला खूप मोठा धक्का बसला होता. मुलाला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण मिळणाऱ्या उपचारांवर ते समाधानी नव्हते. मे 2017 रोजी मुलाच्या आईची मंदिरात आरोपी बाबाशी भेट झाली. त्यांनी संपूर्ण घटनाक्रम त्याला सांगितला. आपण धार्मिक पद्धतीने उपचार करत आजार बरा करु शकतो अशी बतावणी त्याने यावेळी केली’, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

तक्रारीत दांपत्याने दिलेल्या माहितीनुसार, आरोपी भोंदूबाबा घरी आला असता त्याने यज्ञ केलं. यावेळी त्याने महिलेला आणि मुलाला काही राख खाण्यासाठी दिली. ती खाल्ल्यानंतर दोघेही बेशुद्ध पडले. दोघेही शुद्धीत आले तेव्हा आरोपी भोंदूबाबा घरीच होता. हा उपचाराचा एक भाग होता असं सांगत महिलेकडून 60 हजारांचे दागिने घेऊन तो निघून गेला.

काही दिवसांनी आरोपीने पुन्हा एकदा महिलेशी संपर्क साधला आणि पुन्हा एकदा उपचार करणं गरजेचं असल्याचं सांगितलं. उपचार कसा केला जाऊ शकतो यासंबंधी बोलण्यासाठी त्याने महिलेला अंधेरी येथील फ्लॅटमध्ये बोलावलं. तिथे गेल्यानंतर आरोपीने हा उपचाराचा एक भाग असल्याचं सांगत महिलेवर लैंगिक अत्याचार केला. आरोपीने यावेळी व्हिडीओ रेकॉर्ड करत काही फोटोही काढले होते.

यानंतर आरोपीने व्हिडीओ आणि फोटोंचा वापर करत महिलेला धमकावण्यास सुरुवात केली. तसंच सोशल मीडियावर अपलोड करण्याची धमकी देत महिलेकडून पैसे लाटण्यास सुरुवात केली. ‘महिलेने पतीला यासंबंधी कोणतीही माहिती दिली नव्हती. आरोपीने महिलेच्या पतीलाही गंडवत उपचार करायचा असल्याचं सांगत 2.98 लाख रुपये लुटले. एका मोठ्या रुग्णालयात दांपत्याच्या मुलावर उपचार सुरु होता. पण तरीही दांपत्याला आपल्या जाळ्यात ओढण्यात आरोपी यशस्वी झाला’, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

मुलाचा मृत्यू झाल्यानंतरही आरोपीने महिलेला त्रास देणं बंद केलं नव्हतं. अखेर वैतागून महिलेने आपल्या पतीला सगळं सांगितलं. यानंतर त्यांनी पोलिसांत धाव घेतली. पोलिसांनी तक्रार नोंद केली असून तपास करत आहेत.