देशावर करोना विषाणूचं संकंट असल्यामुळे देशातील जनता त्रस्त झाली आहे. सामान्य जनतेपासून सेलिब्रिटींपर्यंत प्रत्येक जण या समस्येमुळे हैराण झाला आहे. त्यातच या काळात अभिनेता आमिर खानने त्याच्या जवळच्या व्यक्तीला गमावलं आहे. गेले २५ वर्ष आमिरचा असिस्टंट म्हणून काम करणाऱ्या अमोस यांचं निधन झालं आहे.

‘इंडियन एक्स्प्रेस’नुसार,अमोस हे २५ वर्षांपासून आमिरसोबत काम करत होते. मात्र हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचं निधन झालं. अमोस यांच्यावर होली फॅमिली हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. मात्र अखेर वयाच्या ६० व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली.

‘लगान’ चित्रपटात आमिरसोबत झळकलेल्या अभिनेता करीम हाजी यांनी अमोसच्या निधनाची माहिती दिली. सकाळी ११.३० वाजता अमोस अचानक जमिनीवर पडले. त्यानंतर आमिर आणि किरण रावने तातडीने त्याला रुग्णालयात नेलं.

”अमोस हे अत्यंत साधे आणि सरळ व्यक्ती होता. एका सुपस्टारसोबत काम करत असल्याचा गर्व त्याला कधीच नव्हता. त्याला कोणता आजारही नव्हता. त्यामुळे त्याच्या अशा अचानक झालेल्या निधनामुळे साऱ्यांनाच धक्का बसला आहे. तसंच आमिरने त्याच्या जवळची व्यक्ती गमावल्यामुळे किरण आणि तो दोघंही प्रचंड दु:खी आहेत”, असं करीमने सांगितलं.दरम्यान, अमोस यांच्या पश्चात त्याची पत्नी आणि दोन मुले, सुना असा परिवार आहे.