आपली देश सोडून जाण्याची इच्छा आहे अथवा भारतात असहिष्णुता आहे, असे वक्तव्य आपण कधीही केले नव्हते. प्रसारमाध्यमांनी माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला, असे बॉलीवूडचे प्रसिद्ध अभिनेते आमिर खान यांनी स्पष्ट केले आहे.
भारताइतकी विविधता अन्य कोणत्याही देशात नाही, मी भारतात जन्मलो आणि भारतातच माझी अखेर होईल, असेही आमिर खान यांनी म्हटले आहे. प्रत्येक देशांत अनेक चढउतार येतात, त्यामुळे कोणीही बेधडक विधाने करू नयेत, असा अप्रत्यक्ष हल्ला अभिनेते अक्षयकुमार यांनी आमिर खान यांच्यावर चढविला. त्या पाश्र्वभूमीवर आमिरने वरील बाब स्पष्ट केली. आमिर म्हणाले की, भारत असहिष्णू आहे, असे मी म्हटले नव्हते. देश सोडण्याची इच्छा असल्याचे वक्तव्यही केले नव्हते, माझ्या वक्तव्याचा वेगळा अर्थ काढला गेला आणि त्याला काही प्रमाणात माध्यमे जबाबदार आहेत.