गोव्यातील अल्पवयीन तरुणीला फेसबुकवरून फसवून मुंबईत आणल्यानंतर तरुणाने तिच्यावर बलात्कार केल्याचे स्पष्ट झाले आहे. कुर्ला रेल्वे पोलिसांनी अखेर या आरोपीला बेडय़ा घातल्या. तो धारावीत भंगारविक्रीचा व्यवसाय करतो. गोव्यात राहणारी १६ वर्षीय  महाविद्यालयीन विद्यार्थिनीची चार महिन्यांपूर्वी मुंबईत राहणाऱ्या मोहम्मद सरताज अली मुर्तजा हसनी (२१) याच्याशी फेसबुकवर ओळख झाली. मोहम्मदने फेसबुकवर खोटय़ा नावाने अकाऊंट उघडलेले होते. फेसबुकवरून ओळख झाल्यानंतर त्याने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यानंतर तिला भेटण्यासाठी मुंबईत बोलावले होते. त्याच्या भूलथापांना बळी पडून ती सात जानेवारी रोजी मुंबईत आली. मोहम्मद तिला कुर्ला स्थानकात घेण्यासाठी आला. त्यानंतर तिला धारावीतील सोशल नगर येथील मित्राच्या घरी घेऊन गेला. तिथे त्याने तिच्यावर बलात्कार केला.