‘सीड मदर’ या तीन मिनिटांच्या लघुपटाचा गौरव 

भारतीय चित्रपटनिर्माते अच्युतानंद द्विवेदी यांना ७२ व्या कान चित्रपट महोत्सवात पुरस्कार मिळाला आहे. ते मूळ मुंबईचे असून सध्या पाँडिचेरीत राहतात.  त्यांच्या ‘सीड मदर’ म्हणजे बीजमाता या तीन मिनिटांच्या लघुपटास  हा पुरस्कार शुक्रवारी नेप्रेसो टँलेंटस २०१९ या विभागात जाहीर झाला. हा तिसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार आहे.

कान महोत्सवात  दरवर्षी समीक्षक सप्ताहात चित्रपटनिर्मितीतल नवीन दृष्टिकोनाचा गौरव नेसप्रेसो टँलेंट या विभागात केला जातो. ९/१६ व्हिडिओ फॉरमॅटमधील लघुपटांना या पुरस्कारात संधी असते. या वेळी वुई आर व्हॉट वुई इट हा विषय देण्यात आला होता. अन्नाच्या माध्यमातील अनुभवांची देवाणघेवाण यात अपेक्षित होती त्यात शेती व जैवविविधता, अन्न वारसा व मूल्य साखळी, लोकप्रिय संस्कृतीतील अन्न असे तीन विभाग होते. एकूण ४७ देशांच्या ३७१ चित्रफि ती त्यात होत्या.

द्विवेदी हे मूळ मुंबईचे असून ते सध्या पाँडिचेरीत राहतात. मुंबईतील जगण्याचा वेग आपला बळी घेईल हे पटल्याने आपण मुंबई सोडली असे त्यांनी सांगितले. परसबागेतील झाडांकरिता चांगल्या बियाणांचा शोध घेतला असता राहीबाई पोपेरे यांचे काम त्यांच्यापुढे आले. त्यांनी यापूर्वी अनेक व्यावसायिक जाहिरातीही केल्या आहेत. सीड मदरचे चित्रीकरण मिरर लेन्सने केल्याचे त्यांनी म्हटले आहे. २०१६ मध्ये त्यांना गेटी इमेजेसने पुरस्कृत केलेला पुरस्कार कान लायन्स विभागात मिळाला होता. तेव्हा त्यांच्या ९० सेकंदांच्या इंटरनर फाइट या लघुपटाचा  गौरव करण्यात आला. त्यात मुंबईतील मार्शल आर्टसपटू फरहान सिद्दीकीची कहाणी त्यात आहे. प्रायोगिक माहितीपट आपण वेगळ्या विषयांवर करीत असतो असे त्यांनी सांगितले.

महाराष्ट्रातील कृषिक्रांतीचे चित्रण

महाराष्ट्रातील संगमनेरमधील (अकोले)राहीबाई सोमा पोपेरे या बीजमाता म्हणून ओळखल्या जातात. त्यांनी शेतीत घडवून आणलेले बदल, तयार केलेली बीजपेढी याचे चित्रण द्विवेदी यांनी सीड मदर लघुपटातून केले होते. नेसप्रेसो २०१९ विभागात पहिला पुरस्कार आंतरराष्ट्रीय गटात न्यूझीलंडच्या जोश मॉरिस यांना सुबक या लघुपटासाठी मिळाला, बालीमधील तांदूळ लागवडीवर ती आधारित आहे. दुसरा पुरस्कार हा मेक्सिकन निर्माते मार्को ऑरेलिओ सेलीस यांना रूफो या लघुपटासाठी मिळाला आहे.