मुंबईतील झोपडपट्टी पुनर्वसन योजनेअंतर्गत (एसआरए) नियम तोडून बांधकामे करणाऱ्या ११ विकासकांवर कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी बुधवारी विधान परिषदेत दिली.
मुंबई शहर व उपनगरात एसआरए प्रकल्पांसाठी असलेल्या नियमावलीची पायमल्ली करुन विकासकांनी बांधकामे केली आहेत, अनेक प्रकल्प रेंगाळलेले आहेत, त्याबाबत शासनाने काय कारवाई केली, असा प्रश्न प्रकाश बिनसाळे, प्रा. जोगेंद्र कवाडे, विद्या चव्हाण, भाई गिरकर आदी सदस्यांनी विचारला होता. झोपडपट्टीवासियांसाठीच्या या योजनेत गैरव्यवाहर होत आहे, बिल्डर गुंडांचा वापर करुन झोपडपट्टीवासियांची संमती मिळवण्यासाठी त्यांना धमकावत असतात, त्याची शासनाने गंभीर दखल घेऊन कारवाई करावी, अशी मागणी या सदस्यांनी केली. गेल्या वर्षभरात एसआरएची नियमावली तोडून १२ प्रकल्पांच्या बांधकाम प्रकरणी  ११ विकासकांवर कारवाई करण्यात आली असून एसआरए योजनेबाबत कुणाची काही तक्रार असेल, तर त्याची २४ तासाच्या आत दखल घेऊन चौकशी करुन कारवाई केली जाईल, अशी ग्वाही मेहता यांनी दिली.