News Flash

वीजचोर टोळीला ‘मोक्का’

वीजचोरांना चाप लावण्यासाठी अशा प्रकारची मुंबईतली ही पहिलीच कारवाई आहे.

शिवाजीनगर पोलिसांच्या कारवाईने अन्य वीजचोरांत जरब

गोवंडी, ट्रॉम्बे आणि मानखुर्द परिसरातील वीज चोरांचा थरकाप उडवून देणारी कारवाई शिवाजीनगर पोलिसांनी केली आहे. शिवाजीनगर येथील वीजचोरीत सक्रिय असलेल्या टोळीला पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्यान्वये(मोक्का) गुन्हा नोंदवून अटक केली आहे. मोक्कातील कठोर तरतुदीमुळे अटकेत असलेली टोळी किमान दोन वष्रे जामीन मिळवून कारागृहातून बाहेर येऊ शकत नाही. या कारवाईच्या भीतीपोटी या परिसरातील वीजचोरांच्या सर्वच संघटित टोळय़ा गायब झाल्या आहेत. वीजचोरांना चाप लावण्यासाठी अशा प्रकारची मुंबईतली ही पहिलीच कारवाई आहे.

गोवंडीच्या शिवाजीनगर, बैंगनवाडी, मंडालेसह मानखुर्द, ट्रॉम्बेतील झोपडपट्टय़ांमध्ये हजारो घरांमध्ये चोरीची वीज पुरवली जाते. वीजपुरवठा करणाऱ्या कंपनीने त्या त्या ठिकाणी बसविलेल्या फीडर पीलरमधून स्वतंत्र वाहिनी घेऊन त्याआधारे परस्पर घराघरांमध्ये वीज जोडणी दिली जाते. घरटी दोनशे ते तीनशे रुपये देऊन हवी तेवढी वीज वापरता येते. त्यामुळे बहुतांश रहिवासी अधिकृत जोडणी न घेता चोरीची वीज वापरतात. फुकट मिळणारी वीज, या भागात दिवसेंदिवस वाढणारी वस्ती लक्षात घेऊन गेल्या काही वर्षांपासून येथे वीजचोरांच्या संघटित टोळय़ा निर्माण झाल्या. प्रत्येकाने आपापली हद्द वाटून घेतली. मात्र दहशतीच्या जोरावर प्रतिस्पध्र्याचा भाग काबीज करण्यासाठी टोळीयुद्ध सुरू झाले. त्यातून हत्या, हत्येचा प्रयत्न, मारहाण, धमक्या, खंडणी अशा गंभीर गुन्हय़ांमध्ये वाढ झाली.

या परिसरात रिलायन्स कंपनीकडून वीजपुरवठा केला जातो. वीजचोरीच्या अनेक तक्रारी कंपनीकडून शिवाजीनगर, मानखुर्द, ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात केल्या गेल्या. त्या त्या वेळी योग्य ती कारवाईही केली गेली. मात्र चोरी थांबली नाही. अखेर कंपनीने काही दिवसांपूर्वी अद्ययावत फीडरचे खांब बसवण्यास सुरुवात केली. या फीडरमधून चोरीची वाहिनी घेणे टोळय़ांना शक्य होत नव्हते. त्यामुळे या फीडरना परिसरात विरोध होऊ लागला. शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चिखलवाडी येथे हे उपकरण बसविणाऱ्या रिलायन्सच्या कर्मचाऱ्यांना वीजचोर टोळीचा म्होरक्या अख्तर अब्दुल कय्युम खान याने धमकावले. खांब बसवायचा असेल तर महिन्याला ५० हजार रुपये देण्यासाठी धमकावले. मात्र कंपनीने पोलीस बंदोबस्ता खांब बसवून घेतला. तो खांब खान व त्याच्या साथीदारांनी गॅस कटरच्या साहाय्याने कापून काढला. या प्रकरणी खानसह सद्दाम इसरार खान, जुबेर अहमद ऊर्फ पापा वसीउल्ला शेख, इम्रान शेख ऊर्फ बाबा शेर, अब्दुल रहिम ऊर्फ अन्वय खान या पाच जणांना खंडणीच्या गुन्हय़ात अटक केली आहे, अशी माहिती परिमंडळ-६चे पोलीस उपायुक्त शहाजी उमाप यांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 17, 2017 2:38 am

Web Title: action on electricity theft under mocca crime act electricity theft issue
Next Stories
1 यंदा ‘मुंबईचा राजा’चा मान कोणाचा?
2 माहीममधील इमारत ‘सिद्धीसाई’च्या वाटेवर?
3 नामवंतांचे बुकशेल्फ : वाचन ही निरंतर प्रक्रिया
Just Now!
X