शिल्पा शेट्टीचा पोलिसांना जबाब

मुंबई : मी कामात व्यग्र असल्याने पती राज कुंद्रा नक्की काय काम करत होता, याबाबत काही माहीत नसल्याचा जबाब अभिनेत्री शिल्पा शेट्टीने दिल्याचे अश्लील चित्रपट निर्मितीप्रकरणी मुंबई पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रातून स्पष्ट झाले आहे.

कुंद्रा याच्यासह चार जणांविरोधात पोलिसांनी १४६७ पानी आरोपपत्र दाखल केले. त्यात शिल्पाच्या नावाचा समावेश साक्षीदारांच्या यादीत करण्यात आला आहे. शिल्पाच्या जबाबानुसार, राज कुंद्र्रा याने २०१५ मध्ये ‘विआन इंडस्ट्रीज’ नावाची कंपनी सुरू केली. त्या कंपनीमध्ये शिल्पाचे २४.५० टक्के समभाग होते. या कंपनीत एप्रिल २०१५ ते जुलै २०२० या कालावधीत शिल्पा संचालक पदावर होती. त्यानंतर तिने वैयक्तिक कारणास्तव संचालकपदाचा राजीनामा दिला. ‘हॉटशॉटस् अ‍ॅप’ व ‘बॉली फेम’ या संदर्भात काही माहीत नाही, असा दावा शिल्पाने पोलिसांना दिलेल्या जबाबात केला आहे.

पोलिसांचा दावा काय?

‘हॉटशॉट्स’अ‍ॅप्लिकेशन निर्मितीसाठी राज कुंद्राने गुंतवणूक केली असून तो पॉर्नोग्राफी प्रकरणात मुख्य सूत्रधार असल्याचे पुरावे गुन्हे शाखेला मिळाले आहेत. कुंद्रासह  मालमत्ता कक्षाने कारवाई करून या अश्लील अ‍ॅप्लिकेशनच्या माहिती तंत्रज्ञान विभागाच्या  प्रमुखास अटक केली होती.