03 March 2021

News Flash

‘अधांतरी’ तंत्रशिक्षण संचालकांना सर्वोत्कृष्ट प्रशासक पुरस्कार

विशेष म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.

डॉ. सु. का. महाजन यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला.

राज्याचे तंत्रशिक्षण संचालक म्हणून तब्बल आठ वर्षे काम करणारे डॉ. सु. का. महाजन हे गेले वर्षभर हंगामी म्हणूनही कार्यरत नाहीत. हंगामी म्हणूनही मुदतवाढ नसताना डॉ. महाजन हे संचालक म्हणून काम करत आहेत. त्यांच्याप्रमाणेच कला संचालक, आयटीआय संचालक, ग्रंथालय संचालकांसह एकूणच तंत्रशिक्षण विभागाचा कारभार हंगामी अथवा ‘अधांतरी’ चाललेला असताना नवी दिल्ली येथील ‘इंडियन सोसायटी फॉर टेक्निकल एज्युकेशन’ (आयएसटीई)ने देशातील तंत्रशिक्षण क्षेत्रातील सर्वोत्तम प्रशासक म्हणून पुरस्कार दिला. विशेष म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.

तांत्रिकदृष्टय़ा डॉ. महाजन यांच्याकडे संचालक म्हणून काम करण्याबाबतचे कोणतेच आदेश तंत्रशिक्षण मंत्रालयाने काढलेले नसताना गेले वर्षभर ते ही जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यातील तंत्रशिक्षण विभागाच्या अखत्यारीतील ९० टक्के  महाविद्यालयात दर्जेदार शिक्षण मिळत नाही की निकषांनुसार अध्यापक नाहीत. राज्यातील अभियांत्रिकी व पदविका अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या हजारो जागा रिक्त राहण्याचे प्रमाण गेल्या तीन वर्षांत सातत्याने वाढत आहे. अभियांत्रिकी महाविद्यालयांचे घोटाळे रोजच्या रोज उघडकीस येत असताना तंत्रशिक्षण संचालनालय त्याला आळा घालण्यास असमर्थ ठरले आहे. अशा वेळी तंत्रशिक्षणाप्रती योगदान, प्रगतीसाठी केलेले प्रयत्न, तंत्रशिक्षण देणाऱ्या संस्थांच्या व्यवस्थापनातील उत्कर्षांसाठी नावीन्यपूर्ण संकल्पना राबविणे, तंत्रशिक्षणासाठी निधीची उपलब्धता करून देणे, युवकांना रोजगार मिळण्यासाठी भविष्यकालीन धोरण, पीएच.डी. करणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन तसेच स्वत:ची प्रकाशित पुस्तके व शोधनिबंध आदींचा विचार पुरस्कार देण्यासाठी करण्यात आल्याचे ‘आयएसटीई’ने म्हटले आहे. विशेष म्हणजे यासाठी देशातील सर्व तंत्रशिक्षण संचालनालयाचे संचालक, विद्यापीठांचे कुलगुरू व तंत्रशिक्षण विभागात कार्यरत असलेल्या सचिवांकडून अर्ज मागविण्यात आले होते. या साऱ्यांमधून राष्ट्रीय स्तरावरील सर्वोत्तम प्रशासक म्हणून महाजन यांची निवड करण्याची हिम्मत दाखविल्याबद्दल खरे म्हणजे ‘आयएसटीई’च्या निवड समितीचा विशेष सत्कार केला पाहिजे, अशी मार्मिक प्रतिक्रिया अभियांत्रिकी अध्यापक वर्तुळात व्यक्त केली जात आहे.

८०० पदे रिक्त

महाराष्ट्राच्या तंत्रशिक्षण विभागाच्या अखत्यारीतील सात महाविद्यालयांपैकी तीन महाविद्यालयांत हंगामी प्राचार्य, अध्यापकांची डझनावारी पदे रिक्त तसेच खुद्द तंत्रशिक्षण संचालनालयात सहसंचालक, उपसंचालक, साहाय्यक संचालक व प्राध्यापकांची सुमारे आठशे पदे रिक्त आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 13, 2016 4:43 am

Web Title: adhantari technical education directors get best administrator award
Next Stories
1 ‘परे’वर १५ डब्यांच्या गाडय़ा वाढवणार
2 मकरसंक्रांतीची सुट्टी १४ की १५ जानेवारीला?
3 मालेगाव स्फोटप्रकरणी आरोप निश्चितीवर सुनावणी होणार
Just Now!
X