प्रसेनजीत इंगळे

वसई-विरार महापालिकेचे मनाई आदेश धाब्यावर; कारवाई शून्य

वसई-विरार महापालिका वृक्षलागवडीसाठी कोटय़वधी रुपये खर्च करत असली तरी शहरातील झाडांवर खिळे ठोकून जाहिराती करणाऱ्यांवर काहीही कारवाई करत नसल्याचे दिसून आले आहे. झाडांवर खिळे ठोकून जाहिराती करणाऱ्यांवर फौजदारी कारवाई करणार असल्याची नोटीस महापालिकेने मागील वर्षी काढली होती. मात्र वर्ष उलटले तरी अद्याप कुणावरही कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे आजही शहरातील झाडांवर खिळे ठोकून जाहिराती लावण्यात येत आहेत.

वसई-विरार महापालिका क्षेत्रात १४ लाखांहून अधिक झाडे आहेत. पालिकेने ही झाडे लागवड करून जतन केलेली आहेत. या झाडांमुळे शहराची शोभा वाढवून ते पर्यावरणाच्या रक्षणात मोठी भूमिका बजावत असतात. मात्र या झाडांचा वापर जाहिरांतीसाठी केला जात आहे. महापालिका इतर ठिकाणी जाहिराती लावल्यास त्यावर कर आकारते, तसेच विनापरवानगी जाहिराती काढून टाकते. यामुळे अनेक व्यावसायिक आपल्या जाहिराती झळकवण्यासाठी झाडांचा वापर करत आहेत. यात प्रामुख्याने शिकवण्या, दवाखाने, ट्रेनिंग कॅम्प, कंपन्याच्या नोकरीसाठीच्या जाहिराती, सुरक्षाबल भरती अशा प्रकारच्या जाहिराती केल्या जात आहेत. त्यासाठी या झाडांवर सर्रास खिळे मारून त्यावर पोस्टर चिकटवले जातात, फलक लावले जात आहेत. झाडांना तारा बांधून मोठे फलक अडकवले जातात. यामुळे झाडांचे आयुष्य तर कमी होत आहेच, पण झाडांना वेगवेगळ्या प्रकारच्या रोगांची लागण होत असते.

महानगरपालिका वृक्ष प्राधिकरण विभाग मात्र याकडे डोळेझाक करत असल्याने वृक्षप्रेमींनी नाराजी व्यक्त करत आहेत. झाडांवर खिळे मारणाऱ्यांवर कारवाई करावी तसेच हे प्रकार बंद करण्यात यावे, अशी मागणी वृक्षप्रेमी संघटनांनी केली होती. २०१८ साली ‘आंघोळीची गोळी’ या संस्थेने या संदर्भाईत मोहीम राबवली होती. या संस्थेने झाडावर असलेले खिळे काढून जाहिराती लावणाऱ्यांवर कारवाईची मागणी केली होती.

महापालिकेने डिसेंबर २०१८ मध्ये वृत्तपत्रात जाहिरात देऊन झाडांवर खिळे मारण्यास मनाई केली होती. झाडांवर खिळे ठोकणाऱ्यावर कारवाई करणार असल्याचे जाहीर केले होते. झाडांना खिळे ठोकणे, विद्रूपीकरण करणे, जाहिराती लावणे आदींविरोधात फौजदारी गुन्हे दाखल करणार असल्याचे या नोटिसीद्वारे बजावण्यात आले होते. मात्र एक वर्ष उलटले तरी यासंदर्भात एकही कारवाई केली नाही.

जाळय़ांकडे दुर्लक्ष

वसई-विरार महापालिका क्षेत्रात अनेक झाडांना संरक्षण जाळ्या लावण्यात आल्या आहेत. ही वृक्ष आता मोठी झाली असली तरी पालिकेने त्या जाळ्या काढल्या नाहीत. या जाळ्या झाडांसाठी हानीकारक आहेत. तसेच रस्त्यालगत झाडांच्या पायापर्यंत डांबरीकरण, काँक्रिटीकरण करून पेव्हर ब्लॉक लावण्यात आले आहेत. यामुळे झाडांच्या मुळापर्यंत पाणी पोहोचत नाही आणि झाडे कमजोर होत आहेत.

आम्ही यासंदर्भात जाहिरातदारांना नोटीस बजावत आहोत, तसेच पाहणी करून अशा जाहिरातबाजांवर नक्की कारवाई केली जाईल.

– सुभाष जाधव, प्रभारी साहाय्यक आयुक्त, वृक्ष प्राधिकारण, महापालिका

जाहिरातींचे फलक लावण्यासाठी झाडांना खिळे मारले जातात. यामुळे झाडांचे आयुष्य कमी होते, तसेच झाडांना काही आजार होतात. झाडांची खोड कमजोर झाल्याने झाडे मृत होण्याची शक्यता असते.

– तुषार वारंग, खिळेमुक्त झाडे संघटना, मुंबई-ठाणे समन्वयक