११ मजली भगवती रुग्णालयात शस्त्रक्रिया विभागाला मात्र जागा नाही; निवडणुकीपूर्वी ११० खाटांच्या रुग्णालयाच्या उद्घाटनाचा घाट
महानगरपालिकेच्या हद्दीत असले तरी गोरेगावपासून ते अगदी पार विरापर्यंतच्या रुग्णांनी सतत गजबजलेले भगवती रुग्णालय पुन्हा एकदा सुरू होत आहे. गेल्या दहा वर्षांपासून निर्माणाधीन अवस्थेत असलेल्या या रुग्णालयाचे उद्घाटन पालिका निवडणुकांच्या मुहूर्तावर होण्याची चिन्हे आहेत. मात्र, या ११ मजली इमारतीत एक शस्त्रक्रिया विभाग उभारण्याचे शहाणपण पालिकेला सुचलेले नाही. त्यामुळे पश्चिम उपनगरांतील तसेच मुंबईच्या उत्तरेकडील रुग्णांना तसेच अपघातग्रस्तांना शस्त्रक्रियासाठी मात्र दक्षिण मुंबईतील रुग्णालयांकडेच धाव घ्यावी लागेल.
table-01

भगवती रुग्णालयाच्या जागी सुपरमल्टिस्पेशालिटी रुग्णालय बांधण्याचे स्वप्न २१ व्या शतकाच्या सुरुवातीला पाहिले गेले. वैद्यकीय महाविद्यालय, नर्सिंग महाविद्यालय, अत्याधुनिक शस्त्रक्रिया साधने या सगळ्या सुविधांसह हे रुग्णालय बांधले जाणार होते. त्यानंतर कूपरमध्ये वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रस्ताव पुढे आला व भगवती त्यात मागे पडते. दरम्यानच्या काळात ढासळत असलेल्या रुग्णालयाच्या इमारतीमुळे लवकरात लवकर विकास करण्याचे प्रयत्न सुरू झाले. त्यातही २००६ पासून या प्रक्रियेला गती आली. दोन वर्षांत सुपरस्पेशालिटी
रुग्णालय विकसित करण्याचे आश्वासन देऊनही प्रत्यक्षात दहा वष्रे उलटल्यावर या रुग्णालयाच्या बांधकामाचा पहिला टप्पा पार पडला आहे. महत्त्वाचे म्हणजे या टप्प्यात ११० खाटांच्या रुग्णालयात दहा खाटांचा अतिदशता विभाग आहे मात्र शस्त्रक्रियाविभाग असलेल्या इमारतीच्या निविदाही अजूनही निघालेल्या नाहीत. धनंजय जुन्नारकर यांनी माहिती अधिकारात काढलेल्या माहितीअंतर्गत हे वास्तव समोर आले आहे. शस्त्रक्रियाविभागच नसेल तर साधे नर्सिंग होम व या रुग्णालयात काय फरक राहणार, असा प्रश्न जुन्नारकर यांनी उपस्थित केला. जुन्या इमारतीच्या जागी शस्त्रक्रिया विभागासह नवीन रुग्णालय बांधण्याचा दुसरा टप्पा अजून सुरूवात होणे बाकी आहे. यासाठी निविदाही काढल्या गेल्या नसून पालिकेचा एकूण संथ कारभार पाहता त्यानंतर संपूर्ण इमारत बांधून होण्यासाठी पुढची पालिका निवडणूक येईल, अशी प्रतिक्रिया उमटत आहे.

रुग्णालयाची रखडकथा
रुग्णालयाच्या पहिल्या टप्प्यातील इमारत २०१४ मध्ये पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र या कामासाठीच दोन वष्रे विलंब झाला आहे. या अकरा मजल्यांच्या इमारतीत तळमजल्याला शवागार, पहिला, दुसरा व तिसरया मजल्यावर दवाखाना, वैद्यकीय प्रयोगशाळा, प्रशासकीय कार्यालय, परिचारिका व वैद्यकीय अधिकारी कार्यालय आदी विभाग आहेत. तिसरया व चौथ्या मजल्यावर अतिदशता विभागासह स्त्री कक्ष, पाचव्या व सहाव्या मजल्यावर पुरुष कक्ष, सातव्या व आठव्या मजल्यावर कक्ष भांडार, आरएमओ रुम, नवव्या व दहाव्या मजल्यावर परिचारिका वसतिगृह व अकराव्या मजल्यावर निवासी डॉक्टरांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.