रक्कम देण्यास विलंब झाल्यास जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई

शासकीय-निमशासकीय सेवेतून निवृत्त होणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना आता यापुढे भविष्यनिर्वाह निधी (पीएफ) मिळण्यासाठी सहा सहा महिने उंबरठे झिजविण्याची आवश्यकता नाही. सेवानिवृत्तीनंतर अगदी दुसऱ्या दिवशी ही रक्कम मिळण्याची व्यवस्था केली जाणार आहे. कर्मचाऱ्याला त्याच्या हक्काची ही रक्कम मिळण्यास विलंब झाल्यास, त्याची भरपाई म्हणून त्यावर व्याज देण्यात येणार असून विलंबास जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई केली जाणार आहे. राज्य शासनाने तशी अधिसूचना काढली आहे.

शासकीय-निमशासकीय सेवेतील अधिकारी वा कर्मचारी कधी निवृत्त होणार, याची माहिती संबंधित विभागाला, कार्यालयांना असते. त्यांच्या सेवापुस्तकात त्याची नोंद असते. निवृत्तीनंतर लवकरात लवकर भविष्यनिर्वाह निधीची रक्कम मिळावी, अशी कर्मचाऱ्यांची अपेक्षा असते. परंतु अनेकदा कर्मचारी निवृत्त झाल्यानंतर, कागदपत्रांची जमवाजमव, विविध प्रकारच्या अर्जावर सह्य़ा करणे, इत्यादी कागदी घोडे नाचविण्यास सुरुवात होते. भविष्यनिर्वाह निधीसाठी वेतनातून कपात केलेली शेवटची वर्गणी, अग्रीम वा उचल याबद्दलच्या तपशिलासह एक प्रमाणपत्र विभागप्रमुख किंवा कार्यालयप्रमुखाकडून संबंधित कर्मचाऱ्याला देणे आवश्यक असते. परंतु त्याची पूर्तता कधीच वेळेवर होत नाही, असा शासनाचा अनुभव आहे. परिणामी निवृत्त कर्मचाऱ्याला भविष्यनिर्वाह निधीची रक्कम मिळण्यासाठी सहा-सहा महिने विविध कार्यालयांमध्ये खेटे घालावे लागतात.

निवृत्तीनंतरची कर्मचाऱ्यांची धावपळ कमी करण्यासाठी आणि त्यांना त्यांच्या हक्काची रक्कम वेळेत मिळण्यासाठी राज्य शासनाने आता महाराष्ट्र सर्वसाधारण भविष्यनिर्वाह निधी नियमात सुधारणा केली आहे. कर्मचारी निवृत्त होणार आहे, त्या वर्षांतच सर्व प्रकारच्या प्रक्रिया व कागदपत्रांची पूर्तता करून देणे विभागप्रमुख वा कार्यालयप्रमुखांना बंधनकारक करण्यात आले आहे.  त्यामुळे निवृत्तीनंतर अगदी दुसऱ्या दिवशीही संबंधित कर्मचाऱ्याला भविष्यनिर्वाह निधीची रक्कम मिळू शकणार आहे, अशी माहिती सामान्य प्रशासन विभागातील सूत्राकडून देण्यात आली. या पुढे भविष्यनिर्वाह निधी मिळण्यास सहा महिन्यांपेक्षा जास्त विलंब झाल्यास संबंधित कर्मचाऱ्याला त्यावर व्याज दिले जाणार आहे, शिवाय विलंबाला जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्याची चौकशी करून त्याच्यावर कारवाई केली जाणार आहे, असे सामान्य प्रशासन विभागाच्या अधिसूचनेत नमूद  करण्यात आले आहे.

(((  संग्रहित छायाचित्र  ))