कास्टिंग काऊच हा प्रकार फार पूर्वीपासून चित्रपटसृष्टीत सुरु असला तरी सर्वच क्षेत्रात असा प्रकार पहायला मिळतो. सरकारी कार्यालयातही पुरुष कर्मचाऱ्यांपासून महिला सहकारी सुरक्षित नाहीत. त्यामुळे तुम्ही केवळ चित्रपटसृष्टीच्याच मागे का लागलात? असा सवाल बॉलिवूडच्या प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शिका सरोज खान यांनी केला आहे. तसेच चित्रपटसृष्टी कमीत कमी महिलांना बलात्कार करुन सोडून देत नाही तर कामही देते, असे व्यक्तव्य त्यांनी केल्याने वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

एका कार्यक्रमादरम्यान माध्यमांशी बोलताना त्यांना चित्रपटसृष्टीतील कास्टिंग काऊच संदर्भात प्रश्न विचारण्यात आला होता. त्याला उत्तर देताना सरोज खान म्हणाल्या, सर्वच क्षेत्रात प्रत्येक मुलीला वापरुन घेण्याचा प्रयत्न केला जातो. त्यातून सरकारी कार्यालयेही सुटलेली नाहीत. त्यामुळे तुम्ही केवळ चित्रपटसृष्टीच्याच मागे का पडला आहात? हे क्षेत्र महिलांना मुलींच्या पोटापाण्याचा प्रश्न तर सोडवते इतर क्षेत्रातील लोकांप्रमाणे त्यांच्यावर बलात्कार करुन सोडून तर देत नाही ना.

आपल्याला नक्की काय करायचे आहे हे याचा विचार मुलींनी करायला हवा. तुम्हाला शरीरसुखाची मागणी करणाऱ्या लोकांच्या हाती यायचे नसेल तर तुम्ही नाही येऊ शकत. तुमच्या जवळ जर कला आहे तर तुम्ही स्वतःला का विकता? असा सवाल करताना चित्रपटसृष्टी आमची आई-बाप आहे, त्यामुळे तुम्ही तीला काहीही म्हणू नका, अशी प्रतिक्रिया सरोज खान यांनी कास्टिंग काऊचवर बोलताना दिली.