डोंबिवलीतील न्यू आयरे रोड भागात राहणाऱ्या रोशन घोरपडे या तरुणाने शनिवारी रागाच्या भरात जन्मदात्री आईची हत्या केल्यानंतर पत्नी संजना (वय २२) हिचीही हत्या केल्याची कबुली दिल्याने पोलीस हादरून गेले आहेत. पोलिसांनी सांगितले, रोशनचा संजनाबरोबर प्रेमविवाह झाला होता. आई रेखा ही सून संजनाबरोबर नेहमी भांडत असे. या सततच्या भांडणाला संजना कंटाळली होती.  या भांडणाला कंटाळून ती माहेरी निघून गेली होती. आईमुळे पत्नी माहेरी निघून गेल्याचा राग अनावर झाल्याने संतापलेल्या रोशनने घरात शनिवारी संध्याकाळी आईच्या डोक्यात दगडी वरवंटा घालून हत्या केली होती. रामनगर पोलिसांनी त्याला अटक करून चौकशी सुरू केली होती.
 या चौकशीदरम्यान रोशनने आपण पत्नी संजना हिचीही हत्या केल्याची कबुली दिली. अंधेरी येथील माहेरी असलेल्या संजनाला रोशनने ठाकुर्लीजवळील बावनचाळ येथे येण्यास सांगितले.  तेथे आल्यानंतर रोशनने तिच्याशी भांडण उकरून काढले.
 नंतर गळा आवळून तिच्या डोक्यात दगड आपटून तिची हत्या केली, असे पोलिसांना सांगितले. या दुहेरी खुनामुळे डोंबिवलीत हळहळ व्यक्त केली जात आहे.
तोतया अधिकाऱ्यास अटक
प्राप्तिकर तसेच केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाचे अधिकारी असल्याचे सांगून काही मंत्र्यांच्या खासगी सचिवांकडून पैसे उकळण्याचा  प्रयत्न करणाऱ्या तोतया अधिकाऱ्यास मरिन ड्राइव्ह पोलिसांनी अटक केली आहे. सुधीर खडसे असे या तोतया अधिकाऱ्याचे नाव असून तो नाशिक येथे पाटबंधारे विभागात नोकरी करतो.
 विजयकुमार गावित यांचे खासगी सचिव विलास तावडे यांच्या घरी खडसे याने पैसे उकळण्याचा प्रयत्न केला. संशयावरून तावडे यांनी पोलिसांकडे तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी खडसे याला अटक केली.