12 December 2017

News Flash

आगरी समाजाच्या अगत्याचे विलोभनीय दर्शन

गेले आठ दिवस डोंबिवलीत सावळाराम महाराज क्रीडासंकुलाच्या भव्य मैदानावर सुरू असलेल्या आगरी महोत्सवाचा रविवारी

प्रतिनिधी, डोंबिवली | Updated: December 9, 2012 2:56 AM

गेले आठ दिवस डोंबिवलीत सावळाराम महाराज क्रीडासंकुलाच्या भव्य मैदानावर सुरू असलेल्या आगरी महोत्सवाचा रविवारी शेवटचा दिवस आहे. त्यामुळ लाखोचा जनसमुदाय रविवारी महोत्सवात उसळण्याची शक्यता असल्याने संयोजकांनी पोलीस बंदोबस्त व अन्य नियोजन केले आहे.
आठ दिवसाच्या कालावधीत अनेक क्षेत्रातील दिग्गज, कलाकार, नेते, मंत्री यांनी महोत्सवाला भेटी दिल्या. यंदा प्रथमच मुस्लीम समाजातील अनेक महिलांनी येथे खरेदी केली. गेल्या वर्षी दोन विदेशी महिलांनी या महोत्सवाला भेटी दिल्या होत्या. आगरी महोत्सव हा केवळ आगरी समाजाचा राहिला नसून, विविध जाती, धर्माचे नागरिकांनी या महोत्सवाला भेटी दिल्या. या महोत्सवानिमित्त आगरी समाजाच्या अगत्याचेच विलोभनीय दर्शन घडत आहे.
कल्याण- डोंबिवली परिसरातील विद्यार्थ्यांना महोत्सव भेटीचे दीड लाख विनामूल्य प्रवेशपत्र वाटण्यात आले होते.  महोत्सवाला कोकणासह, नाशिक भागातून पाहुणे मंडळी भेट देऊन गेली. आठ दिवस म्हणजे आमच्या घरी उत्सव होता, असे यजमान आगरी समाजातील महिलांकडून सांगण्यात आले.
खरेदी झाल्यानंतर आगरी पद्धतीच्या भोजनावर ताव मारायला, साऱ्यांचे पाय वळतात. खाण्याचे चार ते पाच स्टॉल्स महोत्सवात आहेत. कोलंबी, जिताडे, मटण अशा झणझणीत जेवणावर तुटून पडणारे लोक येथे दिसतात. सुक्या मासळीचे स्टॉल्स खरेदीसाठी गजबजून गेले आहेत. वसई पट्टयातील मासळी या ठिकाणी खास विक्रीसाठी आहे. आगरी महोत्सवाच्या आठ दिवसांत अनेक सांस्कृतिक कार्यक्रमही झाले. माध्यम प्रायोजक असलेल्या ‘लोकसत्ता’ने दिलेल्या व्यापक प्रसिद्धीमुळे महोत्सवाच्या यशाला विशेष हातभर लागतो, असे संयोजकांनी सांगितले.

First Published on December 9, 2012 2:56 am

Web Title: agri festival end on sunday
टॅग Agri Festival