मुंबईत जागतिक वित्तीय सेवा केंद्रासाठी (आयएफएससी) केंद्र सरकारने अर्थसाहाय्य द्यावे आणि चांदिवली येथे ‘एम्स’ दर्जाचे अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा असलेले रुग्णालय उभारण्यात यावे, अशी मागणी खासदार पूनम महाजन यांनी लोकसभेत अर्थसंकल्पावरील चर्चेत बोलताना सोमवारी केली. मुंबई शहर ही देशाची आर्थिक राजधानी असून वित्तीय सेवा केंद्राच्या उभारणीसाठी केंद्र सरकारने मदत करावी, असे सांगून महाजन म्हणाल्या, मुंबईत अनेक शहरांमधून रुग्ण येत असतात. नागपूरमध्ये एम्स सुरू होणार असून त्याचप्रमाणे मुंबईतही रुग्णांच्या सोयीसाठी ते उभारण्यात यावे. जेनरिक औषध विक्री केंद्रे, डायलिसिस केंद्रे या बाबींचा गरीब रुग्णांना मोठा उपयोग होणार आहे.