ब्रिटनमध्ये आढळलेल्या करोनाच्या नव्या संकरावतारामुळे सुरक्षेच्या कारणास्तव भारतासह अनेक देशांनी आपली हवाई सेवा स्थगित केल्याने अभिनेत्री प्रियांका चोप्रा, अभिनेता आफताब शिवदासानी, अभिनेता संतोष जुवेकर ही कलाकार मंडळी तिथेच अडकली आहेत.

करोनाचा धोका वाढल्याने ब्रिटनच्या प्रशासनाने कडक टाळेबंदी जाहीर केली आहे, तर भारतासह अनेक देशांनी ब्रिटनसोबतची हवाई सेवाही स्थगित केली आहे. भारताने ३१ डिसेंबपर्यंत हवाई सेवा स्थगित केल्याने चित्रीकरणानिमित्त गेलेले कलाकार तेथेच अडकले आहेत. प्रियांका चोप्रा नोव्हेंबरपासून ‘टेक्स्ट फॉर यू’ या चित्रपटाचे सॅम ह्य़ूगन याच्यासोबत लंडनमध्ये चित्रीकरण करत आहे. जिम स्ट्रॉस दिग्दर्शित या चित्रपटाचे जानेवारीपर्यंत ब्रिटनमध्ये चित्रीकरण करण्याचे नियोजन होते. मात्र, प्रवासी निर्बंधामुळे आता चित्रपटाची टीम पुन्हा अमेरिकेत जाण्यासाठी परवानगी मिळवण्याच्या प्रयत्नात आहे. काही दिवस तरी प्रियांका आणि चित्रपटाच्या संपूर्ण टीमला तेथेच राहावे लागणार आहे. आपल्या पत्नी आणि मुलीला भेटायला गेलेला अभिनेता आफताब शिवदासानीही लंडनला अडकला आहे. या प्रवासी निर्बंधामुळे इंग्लंडमध्ये होणाऱ्या अनेक चित्रपटांचे चित्रीकरणही पुढे ढकलण्यात आले आहे. नीना गुप्ता आणि कल्की कोचलीन यांची प्रमुख भूमिका असलेला ‘गोल्डफिश’ या चित्रपटाचे चित्रीकरणही जानेवारीपासून इंग्लंडमध्ये सुरू होणार होते. मात्र तेथील प्रवासी निर्बंधामुळे चित्रीकरण पुढे ढकलण्यात आले आहे.

अभिनेता संतोष जुवेकर हा लोकेश गुप्ते दिग्दर्शित ‘डेट भेट’ या चित्रपटाचे चित्रीकरण करत होता. या चित्रपटात हेमंत ढोमे, सोनाली कुलकर्णी यांचीही मुख्य भूमिका आहे. नोव्हेंबरपासून सुरू झालेले चित्रीकरण संपून नुकतीच चित्रपटाची टीम भारतात परतली. मात्र संतोष काही कारणास्तव लंडनला राहिला. तो २२ डिसेंबरला भारतात परत येणार होता. मात्र, भारताने ब्रिटनला येणाऱ्या आणि जाणाऱ्या सर्व हवाई सेवा स्थगित केल्याने तो सध्या मित्राकडे राहिला आहे. ‘माझे ६

जानेवारीला दुसरे चित्रीकरण सुरू होणार आहे. माझ्यासारखेच नोकरी आणि शिक्षणानिमित्त तेथे वास्तव्यास असलेले अनेक भारतीय अडकून आहेत. येथील नियम कडक असून त्यांचे पालन न केल्यास दंड ठोठावला जातो. करोनाच्या पार्श्वभूमीवर घेतलेला निर्णय अगदी योग्य असून विमान प्रवास पुन्हा एकदा सुरू होण्याची वाट पाहात आहे,’ असे संतोषने ‘लोकसत्ता’ला सांगितले.