वर्षांतील सरासरी निम्मेच दिवस समाधानकारक हवा;  अंधेरी, माझगावमध्ये प्रदूषण नेहमीचेच

मुंबई : वाढती बांधकामे, रस्त्यावरील वाहनसंख्येत दिवसागणिक होणारी वाढ, नेहमीच होणारी वाहतूक कोंडी, शहरालगत असणारी औद्योगिक क्षेत्रे, उत्सवकाळात फोडले जाणारे फटाके अशा सर्व कारणांमुळे निर्माण होणाऱ्या प्रदूषकांचे दुष्परिणाम मुंबईतील हवेच्या गुणवत्तेवर होत आहेत. हिवाळ्यात तर ही समस्या अधिकच गंभीर रूप धारण करते. मुंबई शहराची ही घुसमट, त्यामागची कारणे, त्यांचे परिणाम, उपाययोजना इत्यादींचा मागोवा घेणारी वृत्तमालिका..

मुंबई शहरातील हवेची गुणवत्ता दर्शविणारा आलेख गेल्या वर्षभरात ढासळला आहे. ‘चांगली’ आणि ‘समाधानकारक’ अशा विशेषणाने हवेची गुणवत्ता दर्शविणारे दिवस आधीच्या वर्षांच्या तुलनेत (२०१७) कमी झाले आहेत. गेल्या वर्षी एकूण दिवसांपैकी ५६ टक्के दिवस चांगली आणि समाधानकारक हवा होती; परंतु २०१८ मध्ये ते प्रमाण ५३ टक्क्यांवर आले आहे. स्वच्छ हवेचे दिवस कमी होणे ही धोक्याची घंटा मानली जात आहे. वाहतूक कोंडी व वाढती बांधकामे याला जबाबदार असल्याचे पर्यावरणविषयक अभ्यास करणाऱ्या संस्थांचे म्हणणे आहे.

मुंबई समुद्रकिनारी वसलेली असल्याने वाऱ्यामुळे दिल्ली, पुण्याच्या तुलनेत येथे प्रदूषित हवेचा ‘निचरा’ वेगाने होतो. परिणामी मुंबईची हवा इतर शहरांच्या तुलनेत चांगली असते; परंतु गेल्या काही वर्षांत वाढत्या बांधकामांमुळे आणि वाहतूककोंडीमुळे हवेची गुणवत्ता ढासळत आहे. गेल्या वर्षी अंधेरी आणि माझगाव या भागांतील हवा सर्वाधिक प्रदूषित असल्याचे आढळले होते. नव्या वर्षांतही अंधेरी, माझगाव, वांद्रे-कुर्ला संकुल, मालाडमध्ये तुलनेने जास्त प्रदूषण आहे. शहरातील वाढती बांधकामे व वाहतूक कोंडी याला जबाबदार असल्याचे निरीक्षण ‘नॅशनल एन्व्हायर्न्मेंटल इंजिनीअरिंग रिसर्च इन्स्टिटय़ूट’नेही (नीरी) नोंदवले आहे.

‘सफर’मार्फत (सिस्टीम ऑफ एअर क्वालिटी वेदर फोरकास्टिंग अ‍ॅण्ड रिसर्च) शहरातील हवेची गुणवत्ता तपासून त्याच्या नोंदी ठेवल्या जातात. चांगली, समाधानकारक, माफक (मॉडरेट), वाईट, अतिवाईट आणि धोकादायक अशा स्तरांवर हवेची गुणवत्ता ठरविली जाते. गेल्या वर्षी यानुसार ठेवण्यात आलेल्या नोंदीचा अभ्यास करता चांगल्या आणि समाधानकारक दिवसांमध्ये घट झाल्याचे दिसते. वाईट आणि अतिवाईट दिवसांची संख्या किंचित (२० टक्क्यांवरून २१ टक्के) वाढली आहे. तर समाधानकारक हवेचे दिवस १२४ वरून ९१ एवढे कमी झाले आहेत. हवा एकही दिवस धोकादायक स्तरावर घसरली नाही ही त्यातल्या त्यात समाधानाची बाब असली तरी वाईट आणि अतिवाईट दिवसांमधील वाढ ही धोक्याची घंटा मानली जात आहे.

दिवाळीत प्रदूषणात वाढ

मुंबईत विभागवार केलेल्या निरीक्षणात अंधेरी आणि माझगाव हे दोन्ही विभाग २०१८ मध्ये सर्वाधिक प्रदूषित विभाग असल्याचे निदर्शनास आले आहे. या दोन्ही विभागांतील हवेचा निर्देशांक ‘अतिवाईट’ या पातळीवरून २०१८ मध्ये ‘धोकादायक’ या पातळीवर घसरला आले. दिवाळीच्या दिवसांत फटाक्यांमुळे प्रदूषणात वाढ होते. वातावरणात मोठय़ा प्रमाणात प्रदूषके फेकली गेल्याने वर्षभरातील इतर दिवसांच्या तुलनेत दिवाळीच्या दिवसांत हवेचा निर्देशांक तीन पट ढासळला. मात्र २०१६-१७ पेक्षा २०१८ च्या दिवाळीत शहरातील हवेची गुणवत्ता ढासळण्याचे प्रमाण कमी होते, असे ‘सफर’चे निरीक्षण आहे.

पारा घसरला,प्रदूषण वाढले

यंदा हिवाळ्यात तापमान जास्त घसरल्याने प्रदूषणाचे दुष्परिणाम जास्त जाणवत आहेत. गेल्या गुरुवारी किमान तापमान १४.७ अंश.से. नोंदवण्यात आले. त्या वेळी शहरातील हवेच्या गुणवत्तेची पातळी ‘अतिवाईट’ स्तरावर घसरल्याची नोंद ‘सफर’ने केली. तर अंधेरीतील हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक ४११ म्हणजे ‘धोकादायक’ स्तरावर नोंदविण्यात आला. तो गेल्या दोन वर्षांपेक्षा अधिक आहे. बांधकामांमुळेही प्रदूषण वाढल्याचे ‘नीरी’च्या अभ्यासातून स्पष्ट झाले आहे. अंधेरीत मेट्रो आणि इमारतींची कामे सुरू आहेत. त्यामुळे अंधेरीतील प्रदूषणात वाढ झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या धुलिकणांचा अंशत: परिणाम होत असल्याचे पर्यावरणतज्ज्ञ विद्याधर वालावलकर यांनी सांगितले.

मुंबईतील प्रदूषणात बांधकामांचा मोठा वाटा आहे. आम्ही केलेल्या अभ्यासानुसार मुंबईतील प्रदूषकांमध्ये ३५ ते ४० टक्के वाटा हा या बांधकामांमधून बाहेर पडणाऱ्या धुलिकणांचा आहे. बांधकामांसाठी सुरू असलेले उत्खनन आणि त्यामधून बाहेर पडणाऱ्या राडय़ारोडय़ाच्या वाहतुकीमुळे हवेत प्रदूषके पसरत आहेत.

– डॉ. राकेश कुमार, संचालक, नीरी