वर्षांतील काही ठरावीक काळात विमान कंपन्या तिकीट दरांत प्रचंड सवलत देण्याचे धोरण अवलंबतात. त्याअंतर्गत पुढील महिन्यात विमान कंपन्यांचा ‘पावसाळी सेल’ असल्यासारखी स्थिती आहे. ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन्ही महिन्यांत बहुतांश दिवशी देशभरातील विविध मार्गावरील विमानांचे तिकीट दर निम्म्याच्या जवळपास आले आहेत. या ‘सेल’मध्ये जेट एअरवेज आणि इंडिगो यांच्यात चढाओढ असून आगामी काळात स्पाइस जेटनेही दरकपात करण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे विमान प्रवास करणाऱ्यांना फायदा होणार आहे.
मुंबई-दिल्ली, दिल्ली-बेंगळुरू, मुंबई-बेंगळुरू, मुंबई-चेन्नई, मुंबई-कोलकाता, मुंबई-गोवा हे देशातील नेहमीच गर्दीत असलेले विमानमार्ग आहेत. या मार्गावर विमान प्रवासासाठी साधारण ४५०० ते ८००० रुपये एवढे तिकीट दर आकारले जातात. मात्र पुढील महिन्यात हे दर १४९९ ते ३४९९ एवढे कमी होणार आहेत. मुंबई-दिल्ली या मार्गावर पुढील महिन्यात ‘इंडिगो’ कंपनी २२९९ रुपयांत तिकीट उपलब्ध करून देत आहे. त्याच वेळी जेट एअरवेजच्या तिकिटाची किंमत २९९९ रुपये एवढी आहे. तर स्पाइस जेट ३०५४ रुपयांत मुंबई-दिल्ली प्रवास घडवत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्याने ही दरकपात करण्यात येत असल्याचे स्पाइस जेटचे मुख्य परिचालन व्यवस्थापक संजीव कपूर यांनी सांगितले. कच्च्या तेलाच्या किमती प्रतिबॅरल ६० डॉलर एवढय़ा घसरल्या आहेत. साहजिकच इंधनाच्या किमतीही कमी झाल्या असून त्याचा परिणाम तिकीट दरांवर होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.