काही दिवसांपूर्वी मुंबईतून एनसीबीनं शादाब बटाटा या ड्रग्ज पेडलरला अटक केली होती. बॉलिवुडमधल्या अनेक सेलिब्रिटींना तो ड्रग्ज पुरवत असल्याचं समोर आलं होतं. शादाबच्या चौकशीतूनच अभिनेता एजाज खानचं नाव समोर आलं होतं. त्याला अखेर NCB नं ताब्यात घेतलं असून त्याची कसून चौकशी सुरू आहे. दरम्यान, एजाज खानला ताब्यात घेतल्यानंतर एनसीबीनं मुंबईतील अंधेरी आणि लोखंडवाला परिसरामध्ये सर्च ऑपरेशन सुरू केल्याची माहिती मिळत आहे. एजाज खान आज राजस्थानमधून मुंबईमध्ये दाखल झाला होता, तेव्हा विमानतळावरूनच त्याला एनसीबीनं ताब्यात घेतलं आहे

 

Bigg Boss च्या सातव्या सीजनमध्ये एजाज खान प्रेक्षकांना दिसला होता. तिथे देखील एजाजची इतर स्पर्धकांसोबत वादावादी हा नेहमीचा विषय ठरला होता. त्यासोबतच चित्रपट आणि मालिकांमध्ये देखील एजाजने भूमिका साकारल्या आहेत. त्यामुळे बॉलिवुडसोबतच छोट्या पडद्यावर देखील एजाजनं चांगलंच बस्तान बसवलं आहे. मात्र, आता ड्रग्ज प्रकरणात एजाज अडकण्याची शक्यता आहे.

बिग बॉसमधून झाला होता आऊट!

Ajaz Khan ला बिग बॉस या रिअॅलिटी शोमधून बाहेर काढण्यात आलं होतं. शोच्या नियमानुसार स्पर्धक एकमेकांवर हात उचलू शकत नाहीत. मात्र, शोदरम्यान एजाज खानने एका स्पर्धकावर वादावादीमध्ये हात उचलल्यामुळे त्याला शोमधून बाहेर काढण्यात आलं होतं. द कपिल शर्मा शोमध्ये देखील एजाज खाननं वाद घातल्याचं समोर आलं होतं.

रक्त चरित्र २, अल्ला के बंदे अशा सिनेमांमध्ये एजाज खानने भूमिका साकारली आहे. २००३ मध्ये आलेल्या पथ सिनेमामधून त्यानं सिनेविश्वात पदार्पण केलं होतं. त्यानंतर लम्हे या सिनेमात देखील त्याने व्यक्तीरेखा साकारली होती.