काँग्रेस अविश्वास ठराव सादर करणार; भाजपची सावध भूमिका

रस्त्यांवर पडलेल्या खड्डय़ांच्या प्रश्नी अहवाल सादर करण्याचा स्थायी समितीच्या आदेशाला पालिका प्रशासनाने वाटण्याच्या अक्षता लावल्याने समिती सदस्यांचा भडका उडाला आहे. या प्रकरणी पालिका आयुक्त अयोज मेहता यांच्या विरोधात मोर्चेबांधणी करण्यासाठी सत्ताधारी शिवसेनेसह सर्वच विरोधी एकत्र आले आहेत. आयुक्तांविरोधात अविश्वास ठराव आणण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.

मुंबईमध्ये दोषदायित्वामध्ये ४४३ कि.मी. लांबीचे १,१८४ रस्ते आणि एकूण ५९,१७६  चौ.मी. क्षेत्रफळाची जंक्शने असून हे रस्ते व जंक्शनवर पडलेले खड्डे बुजविण्याची जबाबदारी त्यांची दुरुस्ती करणाऱ्या कंत्राटदाराची आहे. मात्र या रस्त्यांवरील खड्डेही बुजविण्यात आलेले नाहीत. पालिकेचे अभियंते मुख्यमंत्री, पालिका आयुक्तांचे ऐकत नाहीत. रस्ते खड्डय़ात असून त्याचा मुंबईकरांना फटका बसत आहे. त्यामुळे ही बैठक झटपट तहकूब करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते प्रवीण छेडा यांनी केली.

दादर परिसरातील एक रस्ता पावसाळ्यापूर्वी दुरुस्त केला होता. परंतु पावसाळ्यात त्यावरील डांबर वाहून गेले, असे असताना रस्ते घोटाळ्याला नगरसेवक जबाबदार असल्याचा आरोप अभियंत्यांच्या संघटनेचे नेते करीत आहेत. निविदांमधील अटी-शर्ती अधिकारी निश्चित करतात. पण त्याचे खापर मात्र नगरसेवकांच्या माथी मारतात. महापौर, विरोधी पक्षनेते, स्थायी समिती अध्यक्ष, नगरसेवक यांना कसलेच अधिकार नाहीत. त्यामुळे नगरसेवकांची जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी मनसेचे गटनेते संदीप देशपांडे यांनी या वेळी केली.

महापौरांना सोबत घेऊन मुख्यमंत्र्याची भेट घेऊ आणि काम न करणारे अधिकारी नकोत, अशी विनंती त्यांना करू या, असे भाजपचे गटनेते मनोज कोटक यांनी स्पष्ट केले. दोषदायित्वामध्ये असलेल्या रस्त्यांवरी खड्डे संबंधित कंत्राटदार बुजविणार नसतील, तर त्यांच्याविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करावा. तसेच कोणाच्या दबावाखाली रस्ते घोटाळ्याचा अहवाल राखून ठेवण्यात आला आहे. त्यांची नावे जाहीर करावी, अशी मागणीही मनोज कोटक यांनी केली.

आयुक्त अधिकाऱ्यांकडून कामे करून घेण्यात अपयशी ठरले आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी पालिका आयुक्तांना परत पाठवावे.  विरोधी पक्षाने तसा अविश्वास ठरावा मांडावा, त्याला पाठिंबा दिला जाईल, असे आवाहन करीत यशोधर फणसे यांनी बैठक तहकूब केली. फणसे यांच्या आवाहनानंतर काँग्रेसने आयुक्तांविरोधात अविश्वास ठराव मांडण्याची तयारी सुरू केल्याची माहिती प्रवीण छेडा यांनी ‘लोकसत्ता’ला दिली.

खड्डय़ांच्या दुरूस्तीवरून नगरसेवक आक्रमक

स्थायी समितीच्या गेल्या बुधवारच्या बैठकीत अतिरिक्त आयुक्त आय. ए. कुंदन यांनी मुंबईत केवळ ३५ खड्डे असल्याची माहिती दिली होती. त्यामुळे संतप्त  नगरसेवकांनी पालिका आयुक्तांनी रस्त्यावर फिरून खड्डे मोजावे, कोणत्या रस्त्यांवर किती खड्डे मोजले याची माहिती स्थायी समितीला द्यावी,अशी मागणी केली होती. तसेच ही सर्व माहिती पुढील बैठकीत सादर करण्याचे आदेशही दिले होते. स्थायी समितीच्या गुरुवारच्या बैठकीत प्रशासनाने मुंबईत किती लांबीचे रस्ते, कोणत्या  रस्त्यांची दुरुस्ती करणार, रस्ते घोटाळ्यात अटक करण्यात आलेल्यांची माहिती, २०० रस्त्यांची चौकशी प्रगतिपथावर असल्याची माहिती सादर केली. मात्र त्यामध्ये मुंबईतील खड्डय़ांची आकडेवारी, चुकीची माहिती देणाऱ्याविरुद्धची कारवाई आदी माहितीचा अभाव होता.