वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी सर्वपक्षीय सभा

दिवसाढवळ्या पडणारे खून, अमली पदार्थाचा उघडपणे चालणार व्यापार, मुलींची छेडछाड, चोऱ्यामाऱ्या, धमक्या आदींमुळे त्रस्त भांडुपवासीयांनी इथल्या वाढत्या गुन्हेगारीचे खापर पोलिसांच्या निष्क्रियतेबरोबरच राजकीय नेत्यांवरही फोडले.

भांडुपमधील वाढत्या गुन्हेगारीवर ‘लोकसत्ता मुंबई’त वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर येथील लोकप्रतिनिधी, राजकीय नेते, डॉक्टर, मानसोपचारतज्ज्ञ, सामाजिक कार्यकर्ते, वकील आदी सहविचारी भांडुपवासीयांनी एकत्र येत भांडुपला गुन्हेगारीमुक्त करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले आहेत. या प्रयत्नाचा एक भाग म्हणून गुरुवारी संध्याकाळी भांडुप येथील पराग महाविद्यालाच्या सभागृहात उपाययोजना सहविचार सभा पार पडली. या सभेत सर्वसामान्यांनी जे आम्हाला दिसते ते पोलिसांना का दिसत, समजत नाही, असा सवाल करण्यात आला. तर अटक झालेल्या आरोपींना सोडवण्यासाठी पोलिसांवर दबाव आणणे कधी सोडणार, हा प्रश्न राजकीय नेत्यांना विचारला.

या सभेत सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी, राजकीय नेते, डॉक्टर, मानसोपचारतज्ज्ञ, सामाजिक कार्यकर्ते, वकील, धर्मसंस्थांच्या प्रतिनिधींसोबत भांडुपमधल्या सर्वसामान्य रहिवाशांनी मोठय़ा संख्येने उपस्थिती दर्शवली. तरुण आणि महिलांचा सहभाग लक्षणीय होता. पोलीस दलाच्या वतीने भांडुपचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीनिवास पन्हाळे या सभेत उपस्थित होते. एकेक करून रहिवाशांनी आपले अनुभव सभेत ठेवले. भांडुपमधील गुन्हेगारीची मुख्य केंद्रे, तिथली परिस्थिती, अमली पदार्थ किंवा औषधी गोळ्या, कफ सिरपची नशा, या नशेतून होणारे गुन्हे, मुख्य प्रवाहातून बाजूला पडलेल्या तरुणांना पडद्याआड राहून फूस लावणाऱ्या व्यक्ती, त्यांना मिळणारा राजकीय आश्रय, गुन्हय़ांनंतर कायदेशीर कारवाई टाळण्यासाठी पोलिसांवर येणारा दबाव, पोलिसांकडून कारवाईस होणारी टाळाटाळ, अपुरी आणि निष्क्रिय गस्त, बंद पोलीस चौक्या, पालकांचे दुर्लक्ष अशा विविध विषयांना वाचा फुटली.तक्रारदाराऐवजी पोलीस आरोपी किंवा विरोधकाची बाजू घेतात, गुन्हा घडलेला असताना अदखलपात्र गुन्हय़ाची नोंद होते, नेमक्या कलमांचा समावेश गुन्हय़ात नसतो, आरोपींची अटक किंवा आरोपपत्रास होणारा विलंब, भक्कम पुरावे गोळा करण्यात सातत्याने येणारे अपयश, नेमक्या आरोपींऐवजी निष्पापांना होणारी अटक, अशा एक ना अनेक कहाण्या पुढे आल्या.  गेल्या सहा दशकांपासून राजकारणात सक्रिय असलेले मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचे प्रदेश सरचिटणीस कॉम्रेड मदन नाईक, माजी खासदार संजय पाटील, माजी आमदार शाम सावंत, शिवसेना विभागप्रमुख दत्ता दळवी, काँग्रेसचे पदाधिकारी सुरेश कोपरकर, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष रमेश कोरगावकर, नगरसेविका जागृती पाटील, माजी नगरसेविका अनिशा माझगावकर, वैष्णवी सरफरे, भास्कर विचारे, आरके बीएड महाविद्यालयाचे संचालक रमेश खानविलकर आदी मंडळींनी सभेत आपले मत मांडले.

मुख्यमंत्र्यांना निवेदन

या सभेत पुढे आलेले मुद्दे, उपाययोजनांचे टिपण तयार करून या सभेचे शिष्टमंडळ पुढील आठवडय़ात सोमवारी पोलीस आयुक्त सुबोधकुमार जयस्वाल आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे. या भेटीत भांडुपमधील कायदा-सुव्यवस्थेची सद्य:स्थिती आणि उपाय या मुद्दय़ांवर चर्चा होणार आहे.

राजकारण्यांची ग्वाही

सर्वसामान्यांचा रोख लक्षात घेऊन याच सभेत उपस्थित सर्वपक्षीय राजकीय नेत्यांनी यापुढे पोलिसांवर दबाव आणणार नाही, असे आश्वासन दिले. कारवाईत अटक झालेला पक्ष कार्यकर्ता का असेना त्याच्यासाठी पोलीस ठाण्यात जाऊन गोंधळ घालणार नाही, असा शब्द या वेळी राजकीय नेत्यांनी दिला.