अमर पळधे या नौदलातील तरुणाच्या संशयित मृत्यूप्रकरणी संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी या प्रकरणात लक्ष घालावे, अशी मागणी अमर पळधे यांच्या आई अनुराधा पळधे यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.

२०१३ ला हैदराबाद उच्च न्यायालयाने अमर यांचा मृत्यू संशयास्पद आणि गूढ असल्याचा निकाल दिला होता. यानंतर आता सहा महिन्यांच्या आत नौसेनेने नव्याने चौकशी समिती नेमावी, असे आदेश ७ जूनला दिले आहेत. अमर यांचा १९९३ ला हेलिकॉप्टरमधून समुद्रात उडी मारण्याचा सराव करताना अपघाती मृत्यू झाल्याचे नौसेनेच्या वतीने सांगण्यात आले होते. मात्र अमर यांच्या मृतदेहावर दोन जखमा आढळून आल्या होत्या. तसेच या जखमांबाबत अमरच्या कुटुंबीयांनी नौसेनेला विचारणा केली असता त्यांना माहिती देण्यात आली नव्हती. त्यामुळे गेली २३ वर्षे अनुराधा पळधे या न्यायासाठी लढत असून नौसेनेकडून नौदलातील कोणाला तरी वाचविण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप अ‍ॅड. सुनील गाणू यांनी केला. आम्ही संरक्षणमंत्र्यांशी अनेक वेळा पत्रव्यवहार केले आहेत; परंतु ती पत्रे कदाचित त्यांच्यापर्यंत पोहोचत नसावीत. संरक्षणमंत्र्यांनी या प्रकरणात लक्ष घालावे आणि न्याय मिळवून द्यावा अशी मागणी अनुराधा यांनी केली. तसेच मला ८ डिसेंबरपासून खटला मागे घेण्यासाठी तीन वेळा धमकीचे फोन आले होते. या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.