एका अमेरिकी नागरिकावर हल्ला करून लुटण्याचा प्रयत्न तीन हल्लोखोरांनी केला खरा; मात्र हा हल्ल्याचा प्रयत्न त्यांच्यावर उलटला. हा अमेरिकी नागरिक मुष्ठीयोद्धा असल्याने त्याने आपले कौशल्य वापरत या तिघांचा प्राणपणाने प्रतिकार केला. या अनपेक्षित विरोधामुळे हल्लेखोरांना थेट पळच काढावा लागला.
डेव्हीड पॅरिश (५१) हे लार्सन अ‍ॅण्ड टूब्रो कंपनीत उच्चपदस्थ अधिकारी आहेत. कंपनीच्या कामानिमित्त ते मुंबईत आले होते. पवईच्या हॉटेल रमाडा इंटरनॅशनलमध्ये ते उतरले होते. मंगळवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास ते जॉगिंगसाठी साकी विहार रोडवरून जात होते. त्या वेळी अंधार होता. तीन इसमांनी त्यांच्याकडील बॅग खेचण्याचा प्रयत्न केला. पण डेव्हीड हे मुळात बॉक्सर असल्याने त्यांनी तिघांचा कडवा प्रतिकार केला. अचानक झालेल्या या विरोधाने तिघेही बावचळून गेले आणि अखेर त्यांनी पळ काढला. त्यांनी डेव्हीड यांच्या पाठीवर चाकूने हल्ला केला. या प्रकरणी पवई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलीस तीन हल्लेखोरांचा शोध घेत आहेत. पोलीस हॉटेलच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत. डेव्हीड यांच्या बॅगेत डॉलर असतील या उद्देशाने त्यांना लुटण्याचा प्रयत्न झाला असावा, असे पोलिसांनी सांगितले