24 February 2021

News Flash

उभयचर आणि सरपटणाऱ्या प्राण्यांची माहिती एका ‘क्लिकवर’

उभयचरांच्या सुमारे ४१० तर सरपटणाऱ्या प्राण्यांच्या ६१० प्रजाती भारतात आढळतात.

विविध प्राण्याची माहिती संकलित करण्याची मोहीम सुरू

भारतातील उभयचर व सरपटणारे प्राणी तसेच वेगवेगळ्या जातीचे किडे यांच्याविषयीची माहिती एका क्लिकसरशी उपलब्ध व्हावी यासाठी जीवशास्त्रज्ञ सरसावले आहेत. त्यासाठी या जीवांची विविध माध्यमांमध्ये विखुरलेली माहिती संकलित करण्याची मोहीम सुरू झाली आहे. लवकरच विविध प्रकारच्या उभयचर व सरपटणाऱ्या प्राण्यांच्या प्रजातींची ‘सभा’ एकाच संकेतस्थळावर भरलेली पर्यावरणप्रेमींना पाहायला मिळणार आहे.

भारतातील अनेक प्रदेश हे सरपटणाऱ्या प्राण्यांबरोबरच बेडूक, मगर, काही विशिष्ट प्रकारचे साप यांसारख्या उभयचर प्राण्यांच्या जैवविविधतेने समृद्घ आहेत. या प्राण्यांची माहिती एका ठिकाणी उपलब्ध नसल्याने संशोधनासाठी जीवशास्त्रज्ञांना अडचणी येतात. या समस्येवर उपाय म्हणून तज्ज्ञ जीवशास्त्रज्ञांनी माहितीपर संकेतस्थळांची निर्मिती केली आहे. फुलपाखरू, ड्रॅगनफ्लाय, पतंग किडे, सिकाडा (मोठय़ाने चिवचिवाट करणारा किडा) यांच्याविषयीच्या नोंदी करण्यासाठी दोन वर्षांपूर्वी संकेतस्थळे तयार करण्यात आली होती. मात्र उभयचर व सरपटणाऱ्या प्राण्यांविषयीच्या माहितीसह  छायाचित्रांचे संकलन करण्यासाठी कोणतेही साधन उपलब्ध नव्हते.

उभयचरांच्या सुमारे ४१० तर सरपटणाऱ्या प्राण्यांच्या ६१० प्रजाती भारतात आढळतात. या दोन्ही प्रकारच्या प्राण्यांच्या जगभरातील प्रजातींपैकी सुमारे ५० टक्के प्रजाती या केवळ भारतात आढळून येतात. निरीक्षणाअंती बरेच संशोधक व प्राणीमित्र संकलित केलेली निरीक्षणे व छायाचित्रे थेट समाजमाध्यमांद्वारे प्रसिद्ध करतात. त्यामुळे ती माहिती शास्त्रीयदृष्टय़ा एकाच ठिकाणी संकलित न होता विखुरल्या स्वरूपात उपलब्ध होते, असे जीवशास्त्रज्ञ डॉ. वरद गिरी यांनी सांगितले. माहिती एकत्रित संकलित न झाल्याने त्याचा फायदा संशोधनासाठी होत नाही. त्यामुळे माहिती शास्त्रीयदृष्टय़ा संकलित करण्यासाठी संकेतस्थळांची निर्मिती केली असल्याची माहिती गिरी यांनी दिली. उभयचरांसाठी ‘इंडियन अ‍ॅमफिबियन’ आणि सरपटणाऱ्या प्राण्यांच्या नोंदीसाठी ‘रॅपटिल्स ऑफ इंडिया’ हे संकेतस्थळ बनविण्यात आले आहे. या दोन्ही प्रकारातील प्राण्यांची भारतभर केलेली निरीक्षणे यामध्ये नोंदविण्यात आली आहेत. ऑगस्टमध्ये सुरू झालेल्या या संकेतस्थळावर उभयचरांच्या ४१० प्रजातींपैकी १३१ प्रजातींची निरीक्षणे नोंदवली गेली आहेत. तर ‘रॅपटिल्स ऑफ इंडिया’ या संकेतस्थळावर सरपटणाऱ्या प्राण्यांच्या ६१० पैकी २६१ प्रजातींच्या निरीक्षणाचे संकलन करण्यात आले आहे.

इतर संकेतस्थळांचा आढावा

‘ड्रॅगनफ्लाय’ जातीमधील सुमारे ५०३ प्रजाती भारतात आढळतात. त्यापैकी २०१ प्रजातींच्या माहितीचे संकलन त्यासाठी तयार करण्यात आलेल्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तसेच सिकाडा या किडय़ाच्या २५० प्रजातींपैकी १४३ प्रजातींच्या निरीक्षणाचे संकलन ‘सिकाडा ऑफ इंडिया’ या संकेतस्थळावर झाले आहे. शिवाय पतंग किडय़ाच्या ७०७  प्रजातींचे संकलन ‘मॉथ्स ऑफ इंडिया’ या संकेतस्थळावर झाले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 21, 2017 2:58 am

Web Title: amphibians and reptiles animals information
Next Stories
1 नामवंतांचे बुकशेल्फ : एका जन्मात अनेक जन्मांचा अनुभव
2 गॅलऱ्यांचा फेरा : चेहऱ्यांत गोठलेला काळ..
3 सहा महिन्यांत ३३,६४२ रक्तपिशव्या बाद
Just Now!
X