धर्मनिरपेक्षतेचा पुरस्कार करणाऱ्यांना हिंदुत्ववाद्यांच्या ट्रोलिंगचा सामना करावा लागतो हे आजचे समाजमाध्यमांवरील चित्र. पण गेल्या दोन दिवसांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनाच हिंदुत्ववाद्यांच्या ट्रोलिंगचा त्रास सहन करावा लागला आहे. निमित्त होते नाताळनिमित्त गरीब मुलांसाठी भेटवस्तू देण्याच्या उपक्रमासाठी अमृता फडणवीस यांनी ट्विटरवरून केलेल्या आवाहनाचे. अखेर हिंदू धर्माचा मला अभिमान आहे, असे स्पष्टीकरण अमृता यांना द्यावे लागले.

पीडित-वंचितांच्या मदतीसाठी नेहमीच पुढाकार घेणाऱ्या अमृता फडणवीस यांनी या उपक्रमात सहभाग घेतला आहे. तसेच गरीब मुलांना नाताळाचा आनंद लुटता यावा यासाठी लोकांनी पुढाकार घेऊन भेटवस्तू द्याव्यात, असे आवाहन करणारे ट्वीट त्यांनी केले. त्यावरून हिंदुत्ववादी जल्पकांच्या ट्रोलिंगचा त्रास अमृता यांना सहन करावा लागला.

शेफाली वैद्य यांनी त्यावर आक्षेप घेणारे ट्वीट केले. त्यानंतर ट्रोलिंग सुरू झाले. या आवाहनाच्या माध्यमातून अमृता फडणवीस या ख्रिस्ती धर्माला प्रोत्साहन देत आहेत.. त्यांच्या प्रथा-परंपरांचा पुरस्कार करत आहेत, अशी टीका जल्पकांनी सुरू केली. तसेच अमृता या ख्रिस्ती मिशनऱ्यांच्या अजेंडय़ाला चालना देत आहेत, असाही हल्ला काहींनी चढवला. सणांविषयी इतकी आस्था आहे तर फटाकेमुक्त दिवाळीला विरोध का नाही केला, असा सवालही जल्पकांनी उपस्थित करण्यात आला.

अखेर हिंदू धर्माचा मला अभिमान आहे, असे स्पष्टीकरण अमृता यांना द्यावे लागले. इतर अनेकांप्रमाणे वैयक्तिक आवडीप्रमाणे आपल्या देशात साजरे होणारे अनेक सण मी साजरे करते. आपल्या देशाची ती खरी भावना आहे व त्यामुळे देशाबद्दलचे व धर्माबद्दलचे प्रेम कमी होत नाही, असे उत्तर अमृता यांनी ट्विटरवरून दिले. अर्थात त्यानंतरही वैयक्तिक पातळीवर तुम्ही काहीही करा पण मुख्यमंत्र्यांची पत्नी म्हणून तुमच्या प्रत्येक कृतीचे विश्लेषण होईल व टीकाही होईल, असा इशारावजा सल्ला जल्पकांनी दिला.