एका भारतीय लेखकाने इंग्रजीतून लिहिलेल्या तीन कादंबऱ्या आणि त्यांच्या हिंदूी, मराठीसह अन्य भारतीय प्रादेशिक भाषांमध्ये झालेल्या अनुवादास अभूतपूर्व लोकप्रियता लाभल्याने या कादंबऱ्यांच्या एकत्रित खपाने २० लाख प्रतींचा आकडा ओलांडला आहे. अमिश त्रिपाठी या लेखकाच्या नावावर या साहित्यिक चमत्काराची नोंद झाली असून भारतीय प्रकाशन आणि विक्री व्यवसायाच्या इतिहासातील हा एक विक्रम ठरला आहे. त्रिपाठी यांच्या या तीनही कादंबऱ्यांना पौराणिक-धार्मिक आधार असून ‘भगवान शंकरा’च्या पुराणकथांवर या कादंबऱ्या आधारित आहेत.  
त्रिपाठी यांची ‘द इम्मॉर्टल्स ऑफ मेलुहा’ ही पहिली कादंबरी २०१० मध्ये प्रकाशित झाली. त्यानंतर १२ ऑगस्ट २०११ मध्ये ‘सिक्रेट ऑफ नागाज्’ तर २७ फेब्रुवारी २०१३ मध्ये ‘द ओथ ऑफ वायुपुत्र’ ही कादंबरी प्रकाशित झाली. दोन वर्षांतच पहिल्या दोन कादंबऱ्यांची लाखों प्रतींची विक्री तर ‘द ओथ ऑफ वायुपुत्र’ हे पुस्तक प्रकाशित होण्यापूर्वीच त्याची ४ लाख प्रतींची आगाऊ नोंदणी झाली होती.
बुधवारी मुंबईतील एका कार्यक्रमात सहभागी झालेल्या अमिश त्रिपाठी हे मात्र आपला हा विक्रम हीदेखील भगवान शंकराची कृपा असल्याचे मानतात. भगवान शंकराची कृपा आणि वाचकांच्या प्रेमामुळेच या पुस्तकांना उदंड प्रतिसाद साभला, अशी भावना त्यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना व्यक्त केली. भारतीय प्रकाशन आणि विक्री व्यवसायातील या चमत्काराचे आपण केवळ निमित्तमात्र आहोत, असेही ते विनयशीलपणे म्हणाले. पौराणिक व धार्मिक पाया असलेले साहित्य आजही व आजच्या पिढीलाही वाचायला आवडते आणि तो लोकप्रिय होऊ शकते, हे या निमित्ताने दिसून आल्याचेही ते म्हणाले.  
आता चौथे पुस्तक कधी येणार आणि ते कोणत्या विषयावर आहे, या प्रश्नावर, पौराणिक कथा किंवा इतिहास हाच पुढच्या पुस्तकाचा विषय असेल. डोक्यात वेगवेगळे विचार सुरू आहेत. अद्याप नेमके कशावर लिहायचे ते नक्की केलेले नाही. पण लवकरच माझे चौथे पुस्तक वाचकांसमोर येईल, असे उत्तर त्यांनी दिले.
‘द इम्मॉर्टल्स ऑफ मेलुहा’ आणि ‘ओथ ऑफ वायुपुत्र’ ही पुस्तके इंग्रजी बरोबरच हिंदूीतही प्रकाशित झाली आहेत. त्रिपाठी यांच्या दोन पुस्तकांचा ‘मेलुहाचा मृत्युंजय’ व ‘नागांचे रहस्य’ या नावाने मराठी अनुवाद प्रकाशित झाला आहे. तर ‘द इम्मॉर्टल्स ऑफ मेलुहा’या पुस्तकाचा मल्याळम, गुजराथी, आसामी, तेलुगू, बंगाली भाषेत अनुवाद झाला आहे.