अंधेरी कामगार रुग्णालय आग दुर्घटना

अंधेरीतील कामगार रुग्णालयाच्या आग दुर्घटनेतील मृतांची संख्या अकरावर पोहोचली आहे. होली स्पिरिट रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या आठ दिवसाच्या  मुलीचा गुरुवारी मध्यरात्री मृत्यू झाला. जखमी झालेल्या १८६ रुग्णांपैकी अजून ९१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

जोगेश्वरी येथे राहणाऱ्या ललिता लोगावे यांची प्रसूती १४ डिसेंबर रोजी अंधेरीच्या कामगार रुग्णालयात झाली. प्रसूती काळ पूर्ण होण्याआधीच त्यांची प्रसूती झाली असून त्यात एक मुलगा आणि मुलगी अशी जुळी मुले झाली होती. मुलाचे वजन १.५ किलो होते, तर मुलीचे वजन अवघे ६०० गॅ्रम होते. तिसऱ्या मजल्यावरील लहान मुलांच्या अतिदक्षता विभागात त्यांना ठेवले होते. ललिता यांना रुग्णालयात दुसऱ्या मजल्यावर स्त्रीरोग विभागात ठेवले होते. आगीचा धूर पसरायला लागला तसे रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनी आम्हाला खाली आणले. त्यानंतर काही मिनिटांतच आमची बाळे गुंडाळून आणण्यात आली आणि आम्हाला होली स्पिरिटला पाठविले, असे ललिता यांनी सांगितले.

अपघातानंतर ललिता यांच्या मुलाची तब्येत बरी होती. मात्र त्यांच्या मुलीची प्रकृती गंभीर असल्याने तिला कृत्रिम श्वसनयंत्रणेवर ठेवले होते. गुरुवारी रात्री साडेबाराच्या सुमारास तिचा मृत्यू झाल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली. अपघातात जखमी झालेल्या १८६ रुग्णांपैकी ७६ रुग्णांना घरी सोडण्यात आले. ९१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आठ रुग्णांना इतरत्र रुग्णालयात हलविले आहे.

डॉ. मनीषा गंदेवार यांची प्रकृती स्थिर

कामगार रुग्णालयातील स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. मनीषा गंदेवार यांची प्रकृती आता स्थिर  आहे. आग लागली तेव्हा दुसऱ्या मजल्यावर बाह्य़ रुग्ण विभाग सुरू होता. खिडकीतून बाहेर पडण्याच्या प्रयत्नात गंदेवार या पहिल्या मजल्यावरील सज्जावर पडल्या तेथे काचा पडल्या असल्याने त्यांच्या पायाला दुखापत झाली होती.