वेध व्यवसाय परिषदेमध्ये अनिल अवचट यांचे प्रतिपादन

गरज आणि आवडीनुसार निवडलेले जगणे खऱ्या अर्थाने सुखकारक असते. मात्र बाह्य़ गोष्टींकडे अधिक लक्ष देत दिखाऊपणाच्या हव्यासातून आपण टिकाऊपणाकडे दुर्लक्ष करतो. छोटय़ा-छोटय़ा गोष्टींमधून मिळणाऱ्या आनंदाकडे डोळेझाक करतो. निसर्गाने दिलेला साधेपणा नटण्या- मुरडण्याने गमावून बसतो. या हव्यासातून खूप काही मिळवूनही अंतिमत: सुख हे मृगजळच ठरते. दुसऱ्याचे दु:ख ओळखून त्याला यथाशक्ती मदत करा, त्यातूनच खरे सुख आणि समाधान मिळेल. न मागता केलेली मदत, अधिक सुसंस्कृत असते, असे प्रतिपादन ज्येष्ठ लेखक अनिल अवचट यांनी शुक्रवारी ठाण्यात केले.
वेध व्यवसाय परिषदेच्या उद्घाटन सत्रात यंदाच्या ‘अंतरंग आणि बाह्य़रंग’ या विषय सूत्राविषयीच्या बीजभाषणात त्यांनी याविषयी मुक्तचिंतन केले. सौंदर्य हे कोणत्याही रंगापुरते मर्यादित नाही. तरीही गोरा आणि काळा असा भेद केला जातो. ड्रेसकोड बाळगून अधिक पोशाखीपणा पसंत केला जातो.
मात्र आपण अंतरंगात डोकावून पाहत नाही. मनाच्या मशागतीकडे, त्याच्या आंतरिक सौंदर्याकडे लक्ष देत नाही. निसर्गात अंतरंग आणि बाह्य़रंग असा कोणताही भेदभाव नाही. त्यापासून आपण धडा घ्यायला हवा. आपण आपल्यासाठी गाणे म्हणायला हवे. आपल्यासाठी चित्र काढून पाहायला हवे. पैसा हे साधन आहे. साध्य नाही. ते आपले अन्न होऊ शकत नाही. त्यामुळेच गल्लेलठ्ठ पगार आणि सर्व भौतिक साधने असूनही नव्या पिढीतील अनेकजण निराशाग्रस्त होऊन व्यसनांच्या आहारी गेलेले दिसतात.
आंधळी स्पर्धा, हव्यास आणि स्वार्थ बाजूला ठेवून दुसऱ्याप्रति आदर व स्नेहभाव बाळगण्यातच खरेखुरे सुख आणि सौंदर्य सामावलेले आहे, असे विचार अवचट यांनी आपल्या मुक्त चिंतनातून मांडले.