संस्थांकडे घरातील आजारी मांजरींची जबाबदारी

रस्त्यावरील भटके, अपघातग्रस्त, आजारी प्राण्यांचा सांभाळ करणाऱ्या आणि ‘कॅटवुमन’ म्हणून ओळख असलेल्या अरुणा पंडित यांच्या आजारपणात त्यांच्या घरातील मांजरी आणि श्वानांचा सांभाळ करण्यासाठी प्राणी संस्था सरसावल्या आहे. वयाची सत्तरी पार केलेल्या अरुणा १९९६ पासून मांजरी आणि श्वानांसाठी काम करीत आहेत; परंतु आजारपणामुळे त्यांचा हा कुटुंबकबिला सांभाळण्यासाठी प्राणिप्रेमी सरसावले आहेत.

अरुणा या कांदिवलीतील पोईसर येथे राहतात. एखादे श्वान आजारी, बेवारस असेल तर त्याला अरुणा यांच्या घराचे दार कायम खुले असते. आजाराने त्रस्त असलेल्या मांजरी आणि श्वानांवर उपचार करण्यासाठी ते वेगवेगळ्या संस्थांची मदतही घेतात. या भागातील ३५ ते ४० प्राण्यांचा सांभाळ त्या करीत आहेत. मात्र काही दिवसांपूर्वी रक्तदाब वाढल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या गैरहजेरीत या प्राण्यांची आबाळ होऊ नये म्हणून ‘मुंबई अ‍ॅनिमल असोसिएशन’, ‘पॉस’, ‘पीपीएस’, ‘एसआरटी’, ‘अ‍ॅनिमल मॅटर टू मी’ या मुंबईतील संस्था पुढे आल्या आहेत. यातील मुंबई अ‍ॅनिमल असोसिएशनने मांजरींना दत्तक घेतले आहे, तर तीन वयोवृद्ध श्वानांची जबाबदारी पॉसने स्वीकारली आहे. अर्धागवायू झालेल्या मांजरीला पीपीएने घेतले असून प्राण्यांना योग्य स्थळी पोहोचविण्याची जबाबदारी श्री रामानुग्रह ट्रस्टने आणि अरुणाच्या आजारपणात रुग्णालयाचा खर्च ‘अ‍ॅनिमल मॅटर्स टू मी’ या संस्थेने केला आहे.

अरुणा यांना प्राण्यांबाबत अतिशय प्रेम आहे. त्या त्यांच्या आजूबाजूच्या परिसरातील प्राण्यांचा सांभाळ करतात. अरुणा यांच्या आजारपणात प्राणी संस्थांनी एकत्र येऊन मदत केली आहे. मात्र आता त्यांना आराम करण्याची गरज असून संस्थांनी आजारी मांजरी आणि श्वानांची जबाबदारी स्वीकारली आहे. – नीलेश भणगे, पॉस

या संस्था माझ्यासाठी धावून आल्या याचा मला अतिशय आनंद आहे. मला रक्तदाबाचा त्रास आहे. इतर अनेक आजारांचे प्रश्न निर्माण होत आहेत. प्राण्यांना घरात ठेवणे शक्य नसले तरी बाहेर राहणाऱ्या प्राण्यांना मी शेवटच्या क्षणापर्यंत सांभाळेन.  – अरुणा पंडित