राज्यातील अवैध दारूविक्री, मटका व अन्य गैरकृत्यांना पायबंद घालण्याची मागणी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून केली. त्यासाठी ग्रामपंचायत पातळीवर गावकऱ्यांच्या मदतीने ‘विशेष ग्रामसंरक्षक दल’ स्थापन करून त्यांना काही कायदेशीर अधिकार द्यावेत, असेही त्यांनी स्पष्ट केले. त्यासाठी पावले टाकण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे.

कोपर्डी येथे अल्पवयीन मुलीवर बलात्कार व खून केल्याच्या प्रकरणात आरोपींनी अवैध दारू सेवन केल्याचे आढळून आले आहे. १०-१२ सदस्य असलेली विशेष ग्रामसंरक्षक दले स्थापन करण्यात यावीत. गावात अवैध धंदे, गैरकृत्ये सुरू असल्यास या दलाला धाड घालण्याचा व पंचनामा करण्याचा अधिकार देण्यात यावा. त्यानंतर त्यांनी पोलिस व उत्पादन शुल्क विभागाशी संपर्क साधून गुन्हेगारांवर कारवाई व्हावी, अशी मागणी हजारे यांनी केली.