आयसिसशी संबंध असल्याचा आरोप असलेला कल्याण येथील अरीब माजिदला (२७) विशेष न्यायालयाने मंजूर केलेला जामीन उच्च न्यायालयाने मंगळवारी कायम ठेवला. माजिद हा सुशिक्षित आहे आणि तो सुशिक्षित कुटुंबातून आलेला आहे. त्यामुळे कठोर अटींवर त्याची जामिनावर सुटका करणे हे व्यापक समाजहिताला धोका ठरू शकत नाही वा खटल्यावरही त्याचा विपरीत परिणाम होणार नाही, असेही न्यायालयाने म्हटले.

माजिदने आधीच सहा वर्षे कारागृहात काढली आहेत. त्यामुळे त्याचा जामीन कायम ठेवण्याचा निर्णय हा गुणवत्तेच्या आधारे नाही, तर खटल्याची सुनावणी प्रलंबित असल्याच्या कारणास्तव देण्यात येत असल्याचेही न्यायालयाने नमूद केले. त्याच वेळी कनिष्ठ न्यायालयाने खटला पूर्ण झालेला नसतानाही माजिदवरील आरोप सिद्ध झाले नसल्याचा निष्कर्ष नोंदवून त्याला जामीन मंजूर करण्याच्या निर्णयावर न्यायालयाने ताशेरे ओढले. विशेष न्यायालयाने गेल्या वर्षी १७ मार्चला माजिदला जामीन मंजूर केला होता.