गेल्या काही महिन्यांपासून मुंबईत चोरीला जात असलेल्या मोटरसायकलींचा छडा लावण्यात पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेला यश आले आहे. या प्रकरणी एका तरुणाला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून सुमारे नऊ लाख रुपये किमतीच्या दहा मोटरसायकली हस्तगत करण्यात आल्या आहेत. या मोटरसायकलींमध्ये यामाहा आर-१५, होंडा युनिकॉर्न, पल्सर-२२० अशा महागडय़ा गाडय़ांचा समावेश आहे. या प्रकरणी वांद्रे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाजवळील रामदेव हॉटेलजवळ चोरीला गेलेल्या पल्सरसह मोहम्मद अन्वर शेख याला अटक केली. मोहम्मद अन्वर शेख हा तरुण मोटरसायकल दुरुस्तीचे काम करत होता. विविध भागांमध्ये फिरून तो नव्या कोऱ्या मोटरसायकली हेरायचा आणि चोरायचा. चोरलेल्या मोटरसायकली तो मित्रांमार्फत त्रयस्थ व्यक्तींना विकत असे. बँकेने रिकव्हर केलेल्या मोटरसायकली असून लवकरच कागदपत्रे मिळतील, असे सांगून तो या मोटरसायकली स्वस्तात विकत असे. मिळालेल्या पैशांतून मौजमजा करण्यावर त्याचा भर होता, अशी माहिती चौकशीतून समोर आली. शेख याला सध्या पोलीस कोठडीत ठेवण्यात आले असून तपास सुरू आहे.