मुंबईतील पश्चिम उपनगरातील गटारीची झाकणं चोरून ती भंगारमध्ये विक्री करणाऱ्या दोन जणांना जोगेश्वरी पोलीसांनी अटक केली आहे. अटक केलेल्यांची ओळख पटली असून यातील अब्दुल खान हा कामगार आहे व धीरज सिंह हा टॅक्सी चालक आहे. पोलिसांनी त्यांना चोरी करताना रंगेहाथ पकडले असून त्यांच्याकडून चार झाकणं देखील जप्त करण्यात आली आहेत. अशाच प्रकारच्या गुन्ह्याची नोंद अंबोली आणि वर्सोवा पोलिसात करण्यात आलेली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्याकडे गटाराची झाकणं गायब होत असल्याबाबत बृहन्मुंबई महानगर पालिकेकडून (बीएमसी) अनेक तक्रारी दाखल झाल्या होत्या. बीएमसीच्या वार्ड अधिकाऱ्यांनी देखील याबाबत तक्रार देखील केली होती. यानंतर पोलिसांनी गुन्ह्याची नोंद करून घेत, त्या दिशेने तपास सुरू केला होता. पोलिसांनी सर्वप्रथम ज्या भागातील गटाराची झाकणं गायब झाली आहेत, त्या ठिकाणचे सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासले. यात त्यांना एक टॅक्सा संशयीतरित्या गटाराच्या झाकणाच्या आसपास फिरत असल्याचे दिसले.

जेव्हा यो दोघांना पोलीस उपनिरीक्षक अभिजीत जाधव आणि त्यांच्या पथकाकडून अटक करण्यात आली तेव्हा ते दोघे कारमध्ये चोरी केलेली गटाराची झाकणं घेऊन बसलेले होते व दुसऱ्या ठिकाणची झाकणं चोरी करण्याच्या प्रयत्नात होते. त्यांना ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आल्यानंतर त्यांनी आम्ही परिसरातील अनेक ठिकाणच्या गटारांची झाकणं चोरली व पैशांसाठी ती भंगारमध्ये विकल्याचे कबूल केले.

तर, याबाबत पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, या दोघांनी चोरी करून लपवून ठेवलेली अनेक गटारांची झाकणं आम्ही जोगेश्वरी पूर्व मधील वनदेवी मंदिर परिसरातील झुडपांमधून हस्तगत केली आहेत. त्यांना कबूल केले आहे के ते पैशांसाठी झाकणांची चोरी करायचे. शिवाय त्यांनी हे देखील मान्य केले आहे की, मागील सहा ते आठ महिन्यात जवळापास डझनभर गटारांची झाकणं त्यांनी चोरली आहेत.

जुलै २०१७ मध्ये डॉ. दीपक अमरापूरकर यांचा एल्फिन्स्टन परिसरातील उघडय़ा गटारात (मॅनहोल) पडून वाहून गेल्याने मृत्यू झाला होता.