|| नमिता धुरी

साहित्य, जागेच्या प्रश्नामुळे कुचंबणा; सरावाअभावी अडचणी

मुंबई : महाविद्यालये सुरू होण्याची प्रतीक्षा करत वर्ष सरले तरीही प्रत्यक्ष वर्ग न भरल्यामुळे प्रात्यक्षिकांवर अवलंबून असणाऱ्या कला अभ्यासक्रमाचे विद्यार्थी हवालदिल झाले आहेत. शिल्पकला, धातुकाम, वस्त्रकला, वास्तू सजावट इत्यादींचे शिक्षण घेणारे विद्यार्थी वर्षभरात अनेक महत्त्वाच्या प्रात्यक्षिकांना मुकले. खेडोपाडी आपापल्या घरी असलेल्या विद्यार्थ्यांना आवश्यक साहित्यही सहजतेने उपलब्ध होत नसल्यामुळे मिळेल त्या साहित्यावर समाधान मानून विद्यार्थ्यांना सराव करावा लागत आहे.

कला महाविद्यालयांमधील पहिल्या वर्षांत विद्यार्थ्यांचा चित्रकलेतील पाया भक्कम करण्यावर भर दिला जातो. त्यानंतर विशिष्ट विषय निवडून शिक्षण सुरू होते. त्यामुळे माती, धातू, मेण, हातमाग-यंत्रमाग इत्यादी माध्यमे विद्यार्थ्यांना दुसऱ्या वर्षांपासून हाताळायला मिळतात. मात्र, गेले संपूर्ण वर्ष विद्यार्थी महाविद्यालयांमध्ये येऊ शकले नाहीत. त्यामुळे दुसऱ्या वर्षांपासून पुढे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिके होऊ शकली नाहीत.

विद्यार्थ्यांनी मिळेल त्या साहित्यात साकारलेल्या कलाकृतींचे परीक्षण करण्यासाठी प्राध्यापक चित्रफिती, छायाचित्रे यांचा आधार घेत असले तरीही महाविद्यालयांमधील कलात्मक वातावरणापासून विद्यार्थी वंचित आहेत. महाविद्यालयाच्या आवारात किं वा स्टुडिओमध्ये असणाऱ्या माजी विद्यार्थ्यांच्या कलाकृतींचा अभ्यास नव्या विद्यार्थ्यांना करता येतो. शिवाय एकमेकांच्या कलाकृतींची तुलना करूनही त्यातील गुण-दोष कळतात. महाविद्यालयात होणाऱ्या महोत्सवांमध्ये आपल्या अभ्यासक्रमाव्यतिरिक्त इतर विभागांशी संबंधित माध्यमांमध्ये काम करण्याची संधी मिळते. ऑनलाइन शिक्षणात या गोष्टी शक्य झाल्या नाहीत. घरी उपलब्ध साहित्यांत

अभ्यास..

घरातून शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी घरात उपलब्ध टाकाऊ वस्तूंपासून कलाकृती तयार करण्यास सुरुवात केली आहे. मात्र, काही अभ्यासक्रमांचे साहित्य घरी उपलब्ध होऊ शकत नाही. त्याचा खर्चही खूप असल्यामुळे प्रत्यक्ष कलाकृती न साकारताच विद्यार्थ्यांचा अभ्यास सुरू आहे. शिल्पकलेसाठी शाडू माती हे सर्वात पहिले माध्यम असते. त्यानंतर धातू, फायबर, लाकूड, दगड, मेण, पीओपी आदी माध्यमांमध्ये काम केले जाते. सध्या विजेच्या तारा, कागदाचा लगदा इत्यादी साहित्यांद्वारे विद्यार्थ्यांना शिल्प साकारावे लागत आहे. वस्त्रकलेच्या विद्यार्थ्यांना हातमाग आणि यंत्रमागावर कापड विणण्याचा प्रत्यक्ष अनुभव महाविद्यालयात घेता येतो; पण सध्या आयताकृती लाकडी चौकटी, ऑनलाइन बाजारपेठेत उपलब्ध असलेले कापड यांचा आधार विद्यार्थ्यांना घ्यावा लागत आहे. धातुकाम शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनाही मिळेल तो पातळ पत्रा वापरून सराव करावा लागत आहे.

ऑनलाइन शिक्षणाला मर्यादा

महाविद्यालयात अनुभवी मॉडेल समोर बसवून विद्यार्थी काम करतात. घरी शिल्प तयार करताना मॉडेल आणि कलाकार दोघेही अननुभवी असतात. त्यामुळे मॉडेलला नेमके  कसे बसवावे, प्रकाशाची दिशा इत्यादी गोष्टींवर मार्गदर्शन मिळत नाही. ‘न्यूड स्टडी’ तर ऑनलाइनमध्ये मुळीच शक्य नाही. धातू, मेण वितळवण्यासाठी आवश्यक असलेली भट्टी विद्यार्थ्यांकडे नाही. भट्टी हाताळण्याचे ज्ञान महाविद्यालयातच मिळते.

शेवटचे दोन-अडीच महिने तरी प्रत्यक्ष अध्यापनासाठी मिळतील अशी आशा होती. व्यावसायिक शिल्पकार म्हणून काम करताना धातू हे महत्त्वाचे माध्यम असते. ते अंतिम वर्षी हाताळायला मिळते. त्यामुळे महाविद्यालये सुरू व्हायला हवीत. – नितीन मेस्त्री, प्राध्यापक, शिल्पकला, ज. जी. कला महाविद्यालय