अपघाताने दगावणे हे एखाद्याचे दुर्दैव असते, पण आम्ही तर अपघाताने जिवंत राहात आहोत. गेल्या कित्येक वर्षांपासून दररोज संध्याकाळी आम्ही घरी परतलो की अपघातानेच बचावलो, अशी भावना व्यक्त करून आम्ही देवाचे आणि दैवाचेही आभार मानतो आणि दुसऱ्या दिवशीच्या संकटाला सामोरे जाण्याच्या भीतीने अंथरुणावर आडवे होतो. दिवसभराच्या संघर्षांमुळे काही मिनिटांतच डोळा लागतो आणि झोप पूर्ण होण्याआधीच जाग येते. तेव्हा नुकतीच पहाट फटफटू लागलेली असते. आता दिवस उजाडणार, मग आवरून निघावे लागणार या धास्तीने मग पुन्हा डोळा लागतच नाही. कसेबसे उठून नाइलाजाने नव्या दिवसाला सामोरे जाण्याची तयारी सुरू होते. कामावर जाण्यासाठीची सिद्धता झाली की, रणभूमीवर जाणाऱ्या जवानाप्रमाणे देवासमोर नतमस्तक होऊन आम्ही बाहेर पडतो. जिना उतरून रस्त्यावर येण्यापूर्वी पुन्हा एकदा मागे वळून पाहणे एव्हाना एवढे अंगवळणी पडलेले असते की, आपण घरच्यांचा निरोप घेत आहोत, हे ध्यानातही येत नाही. घराच्या खिडकीतून निरोपाचे हात हलत असतात. आम्हीही त्याला तसाच प्रतिसाद देऊन रस्त्यावर येतो. बस स्टॉपवर असंख्य प्रवासी रांगेत ताटकळलेले असतात. आम्ही निमूटपणे त्या रांगेचा भाग होऊन उभे राहतो. बसच्या प्रतीक्षेत लांबवर नजर लागलेली असल्याने, आसपासचे तर भानच नसते. दीर्घ प्रतीक्षेनंतर एखादी बसगाडी येते, तोवर मागची रांगही लांबलचक झालेली असते. बसच्या दरवाजापर्यंत लोंबकळणाऱ्या गर्दीत घुसताना, खिडकीची दांडी, दरवाजाची पट्टी किंवा पुढच्या प्रवाशाच्या खांद्याला टांगलेल्या बॅगचा पट्टा, काहीही आम्हाला आधारासाठी उपयुक्त वाटत असते. त्याला लोंबकळून स्टेशनवर पोहोचेपर्यंत, सकाळी परीटघडी उलगडून अंगावर चढविलेले कपडे घामाच्या धारांनी अंगावर घट्ट चिकटलेले असतात, पण त्याचे काहीच वाटत नाही. कारण प्रत्येकाचीच तीच अवस्था असते..

स्टेशनबाहेरच्या थांब्यावर बस थांबते. आसपास तशाच गर्दीने भरलेल्या अनेक बसगाडय़ा येऊन थांबत असतात.. वारुळातून मुंग्या बाहेर पडाव्यात तशी गर्दी बसगाडय़ांमधून बाहेर पडते आणि स्टेशनच्या दिशेने अक्षरश: धाव घेते.. स्टेशनबाहेरच्या पिंपळाच्या झाडाखाली कुणीतरी साईबाबांचा एक जुनाट फोटो लटकावूनच ठेवलेला असतो. घाईघाईने जिना गाठण्याआधी आम्ही त्या फोटोसमोर क्षणभर थबकतो, मनातल्या मनात नतमस्तक होतो आणि उपनगरी रेल्वेगाडी पकडण्यासाठी लागणारे धैर्य क्षणात अंगात संचारून जाते. पुन्हा एकदा साईबाबांना नमस्कार करून तरुणाईला लाजवेल अशा जोशात आम्ही नर्तकाच्या कौशल्याने उभे-आडवे पदन्यास करत जिने पार करून फलाटावर दाखल होतो.. फलाटावरचा घामाचा घमघमाट एव्हाना आमच्या सवयीचा झाला आहे. आमच्या सरावलेल्या नाकाला रेल्वे रुळाखालून वाहणाऱ्या गटाराशेजारी कुजून पडलेल्या गलेलठ्ठ उंदराच्या दरुगधीचाही त्रास होतच नाही. आसपासच्या गर्दीकडे दर्दीपणाने पाहणारी आमची सुरुवातीची नजर एव्हाना पुरती मरून गेली आहे. नजरेत टोकाचा त्रयस्थपणा आला आहे. त्याच त्रयस्थ नजरेने आम्ही आसपासची गर्दी न्याहाळतो, पण या गर्दीशी सामना करून आपल्याला रेल्वेगाडीतील जागा पटकावयाची आहे, ते आव्हान पेलण्याआधीचा अंदाज घेणे एवढाच त्यामागचा हेतू असतो.. अशातच, अचानक फलाटावरचा ध्वनिक्षेपक कोकलू लागतो. आम्ही जिथे उभे असतो त्या फलाटावर येणारी गाडी दुसऱ्या फलाटावर दाखल होणार असते. ‘असुविधाके लिये खेद है’ असे शब्द कानावर आदळताच आम्ही पुन्हा पहिल्याच कौशल्याने जिना पार करून दुसऱ्या फलाटावर पोहोचतो, तोवर गर्दीने ओसंडून वाहणारी गाडीदेखील तेथे दाखल झालेली असते. जागा पटकावण्याची सारी उमेद हरवलेल्या गलितगात्र अवस्थेत आम्ही दरवाजाच्या गर्दीतून कसेबसे डोके आत खुपसतो आणि दोन-चार शिव्या कानावर पडल्या की, आपण आतमध्ये घुसल्याचे समाधान मिळते.. मग वरची कडी पकडण्याचा संघर्ष सुरू होते. तंगडय़ांवरून घामाचे प्रवाह तळ गाठू लागलेले असतात. खांद्यावरच्या पिशवीचा बंद दुसऱ्या कुणा प्रवाशाच्या मनगटात अडकलेला असतो आणि शेजारच्या प्रवाशाच्या पाठीवरची बॅग ढुशा देत असते.. मग गाडी फलाटावरून हलते आणि हातदेखील हलविणे शक्य नसल्याने, आम्हाला मनातल्या मनात पुन्हा एकदा देव आठवतो. नमस्कार करून धीर गोळा करत आम्ही मार्गस्थ होतो. खिडकीबाहेर पाहणे तर शक्यच नसते. मग बिस्किटांचा वास नाकात घुसला की पार्ला आल्याची जाणीव होते. इथपर्यंतचा प्रवास लटकत का होईना, सुरक्षितपणे पार पडलेला असतो. हळूहळू इंचाइंचाने सरकत एव्हाना आम्ही डब्यात शिरकाव केलेला असतो. चौथ्या सीटवरचा कुणी कष्टकरी, झोपेच्या अधीन झालेला असतो. आपण पडणार नाही याची त्याला खात्री असते, कारण आसपासच्या गर्दीच्या भिंतीवर त्याचा पुरता भरवसा असतो. गाडी वांद्रय़ाला येते आणि तो खडबडून जागा होतो. खाडीच्या वासाची सवय!.. दादर येण्याआधी तो उठून उभा राहतो आणि खुणेनंच आम्हाला बसायचा इशारा करतो. ही चौथी सीट म्हणजे, मुंबईचा माणुसकीचा कोपरा असतो.. आम्हीही या कोपऱ्यावर बसूनच माणुसकीचा पाठ गिरवलेला असतो.. वांद्रय़ाच्या खाडीवरून गाडी सरकते, तेव्हा पुन्हा आमचे हात जोडले जातात.. पुढचा प्रवास सुरू होतो. मुंबई सेंट्रल, ग्रँट रोड, चर्नी रोड स्थानके पार पडतात आणि आम्ही छाती भरून श्वास घेतो. बाजूला अथांग निळा समुद्र शांतपणे किनाऱ्याशी खेळत असतो. त्याकडे पाहून आम्ही पुन्हा एकदा हात जोडतो.. प्रवास सुखरूप पार पडल्याची भावना त्या नमस्कारात असते, हे आम्हाला एव्हाना जाणवतही नाही.. चर्चगेटला उतरून ऑफिस गाठण्याची कसरत त्या प्रवासापुढे क्षुल्लकच असते. आम्ही ऑफिसला पोहोचतो आणि टेबलावरच्या मारुतीच्या फोटोसमोर नकळत हात जोडले जातात..

संध्याकाळी घरी परतताना पुन्हा तेच दिव्य पार पाडायचे असते. पावले जडावलेली असतात.. पुन्हा टेबलवरच्या मारुतीला नमस्कार करून आम्ही स्टेशन गाठतो आणि जिवंतपणे उसळणाऱ्या गर्दीचा निर्जीव भाग होऊन त्यामध्ये सामावून जातो. दैवाच्या भरवशावर स्वत:ला सोपवून गर्दीसोबत स्वत:ला गाडीत झोकून देतो आणि सकाळच्याच पद्धतीने गाडीत कसेबसे कोंबून घेऊन घर गाठतो.. घरी गेल्यावर एक आश्वस्त जाणिवेने स्वत:ला बजावतो, ‘आज अपघातानेच बचावलो!’..