ज्येष्ठ पाश्र्वगायिका आशा भोसले यांचे प्रतिपादन

मुंबई : माझे वडील दीनानाथ मंगेशकर यांच्या नावाचा पुरस्कार त्यांच्याच मुलीला मिळणे हाच सर्वात मोठा सन्मान आहे. यापेक्षा दुसरा कोणताही मोठा सन्मान नाही. याचा आनंद आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ पाश्र्वगायिका आशा भोसले यांनी मंगळवारी मुंबईत केले.

मा. दीनानाथ स्मृती प्रतिष्ठान, हृदयेश आर्ट्स, जयसत्य चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने षण्मुखानंद सभागृहात ७६ व्या दीनानाथ मंगेशकर स्मृती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. केंद्रीय रस्ते वाहतूक विकास मंत्री नितीन गडकरी हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. त्यांच्या हस्ते आशा भोसले यांना दीनानाथ मंगेशकर जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. एक लाख एक हजार एक रुपये, चांदीचे तबक आणि स्मृतीचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. पुरस्कार स्वीकारल्यानंतर मनोगत व्यक्त करताना त्या बोलत होत्या.

वडिलांच्या गाण्याचा वारसा आम्ही भावंडांनी पुढे चालविला आहे. वडिलांची गाणी जेवढी जमतील तेवढी मी साकारल्याचे सांगून आशा भोसले म्हणाल्या आजही त्यांच्याच गाण्यांनी मी दररोज रियाज करते.

रसिकांच्या आग्रहाखातर त्यांनी दीनानाथ मंगेशकर यांचे ‘भाळी चंद्र असे धरिला’ हे नाटय़पद सादर केले आणि उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात त्यांना दाद दिली.

गडकरी यांनी अध्यक्षीय भाषणात सांगितले, की मंगेशकर कुटुंबियांनी भारतीय संगीताला समृद्ध आणि संपन्न केले आहे. पुढील शंभर वर्षे मंगेशकर घराण्याचे हे योगदान रसिक विसरणार नाहीत. पुरस्कार मिळाला की काम करण्याचा उत्साह वाढतो, प्रोत्साहन मिळते.

या कार्यक्रमात ‘मसाला किंग’ धनंजय दातार, कवी योगेश गौर, ‘एबीपी माझा’चे संपादक राजीव खांडेकर, अभिनेते अनुपम खेर, संगीत नाटक अकादमीचे अध्यक्ष शेखर सेन, ज्येष्ठ सरोदवादक अमजद अली खाँ यांनाही गडकरी यांच्या हस्ते दीनानाथ मंगेशकर स्मृती पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.