काँग्रेसमध्ये गटबाजीशिवाय जान येत नाही, असे नेहमी बोलले जात असले तरी नवे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण हे गटबाजी रोखण्यात कितपत यशस्वी होतात हे महत्त्वाचे ठरणार आहे. मुंबई काँग्रेसमध्ये मात्र गटातटाचे राजकारण संपण्याची शक्यता कमीच आहे.
अशोक चव्हाण यांची नियुक्ती झाल्यावर नारायण राणे यांनी बंडाचे निशाण फडकविले. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि अशोकरावांमध्ये फार काही सख्य नाही. ‘आदर्श’ घोटाळ्याच्या चौकशीसाठी आयोग नेमून पृथ्वीराज चव्हाण यांनी अशोक चव्हाण यांची कोंडी केली होती. तेव्हापासून उभयतांमध्ये तेवढे चांगले संबंध राहिलेले नाहीत. गेल्या वर्षी लोकसभा निवडणुकीत अशोक चव्हाण यांना नांदेडमधून उमेदवारी देण्यास पृथ्वीराज चव्हाण यांनी विरोध दर्शविला होता. राज्य काँग्रेसमध्ये पृथ्वीराज चव्हाण यांना मानणारे नेते किंवा कार्यकर्त्यांचा फार मोठा संच नाही. तसेच नेतृत्वाच्या विरोधात जाण्याचा पृथ्वीराजबाबांचा स्वभाव नाही. मावळते अध्यक्ष माणिकराव ठाकरे यांना मानणारा पक्षात मोठा वर्ग आहे. अशोक चव्हाण हे मुख्यमंत्री असताना त्यांचे माणिकरावांशी उत्तम संबंध होते. चव्हाण यांनी राजीनामा दिल्यावर माणिकराव पृथ्वीराजबाबांच्या जवळ गेल्यावर अशोकराव आणि माणिकरावांमध्ये धुसफूस सुरू झाली होती. माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या गटातील बहुतांशी नेत्यांनी अशोक चव्हाण यांच्याशी आधीच जुळवून घेतले आहे.
सर्वांना बरोबर घेऊन जाण्यावर आपला भर असून, गटबाजीला अजिबात थारा देणार नाही, असे अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केले. सर्वांना बरोबर घेण्याची अशोकरावांची भूमिका असली तरी पक्षातून त्यांना किपतपत साथ मिळते हा महत्त्वाचा मुद्दा आहे. राज्याचे मुख्यमंत्रीपद भूषविले असल्याने त्यांना नेतेमंडळींची चांगली माहिती आहे. पक्ष सत्तेत नसल्याने नेतेमंडळी फार काही गडबड करण्याची शक्यता दिसत नाही. तरीही अशोकरावांना गटबाजीचा काही प्रमाणात तरी सामना करावा लागेल अशी चिन्हे आहेत.

१४ वर्षांनंतर विदर्भाबाहेर प्रदेशाध्यक्षपद
रणजित देशमुख यांची २००१ मध्ये प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यापासून गेली १४ वर्षे सतत हे पद विदर्भाकडे होते. देशमुख यांच्यानंतर प्रभा राव आणि माणिकराव ठाकरे या नेत्यांनी अध्यक्षपद भूषविले. ठाकरे यांच्याकडे विक्रमी साडेसहा वर्षे अध्यक्षपद होते. अशोक चव्हाण यांच्यामुळे अनेक वर्षांनंतर मराठवाडय़ाकडे अध्यक्षपद आले आहे.

निरुपम यांच्यासमोर आव्हान
मुंबई काँग्रेसमध्ये गुरुदास कामत, कृपाशंकर सिंग, मििलद देवरा, प्रिया दत्त आदी नेत्यांना मानणारे कार्यकर्ते आहेत. नवे अध्यक्ष संजय निरुपम यांचा आक्रमक स्वभाव तसेच कोणाचीही भीड ठेवायची नाही ही त्यांची कामाची पद्धत लक्षात घेता पक्षातील अन्य नेत्यांशी जुळवून घेणे त्यांच्यासाठी कठीण जाईल, अशी चिन्हे आहेत.