विद्याधर कुलकर्णी, मानसी जोशी

झगमगत्या प्रकाशाच्या दिवाळीचा आनंद वैचारिक वाचनाद्वारे द्विगुणित करणाऱ्या ‘अक्षर फराळा’ला यंदा आर्थिक मंदी आणि दिवाळीच्या तोंडावर आलेल्या विधानसभा निवडणुकीची झळ बसली आहे. विविध राजकीय पक्ष, बँका आणि व्यावसायिकांनी जाहिरात देण्यास हात आखडता घेतल्याने गेल्या वर्षीच्या तुलनेत जाहिरातींचे प्रमाण निम्म्याने घटले आहे.

जाहिरातींचे प्रमाण घटल्याने दिवाळी अंकांच्या किमतींमध्ये किमान २५ ते ३० टक्के वाढ झाली आहे. सध्या बाजारात जेमतेम ५० दिवाळी अंक दाखल झाले असून पुढील आठवडय़ाअखेपर्यंत त्यांची मोठी उलाढाल होईल.

वेगवेगळे विषय हाताळणारे विशेषांक आणि वेगवेगळ्या वयोगटांतील वाचकांना डोळ्यासमोर ठेवून राज्यभरातून दर वर्षी किमान साडेतीनशेच्या आसपास दिवाळी अंक प्रकाशित होतात. राज्यभरातील सर्व दिवाळी अंकांची एकूण उलाढाल ही साधारणपणे २५ कोटी रुपयांच्या घरात जाते, अशी माहिती ‘अक्षरधारा बुक गॅलरी’चे रमेश राठिवडेकर यांनी दिली.

मराठी भाषा आणि साहित्यासाठी आपलाही खारीचा वाटा म्हणून व्यवसायाची गणिते बाजूला ठेवून बांधकाम व्यावसायिक दिवाळी अंकांना जाहिराती देत होते, त्या यंदा फारशा मिळाल्या नाहीत. बँकांवरही जाहिराती देण्यासंदर्भात बंधने आली आहेत. साखर कारखान्यांची आर्थिक परिस्थिती पाहता तेथूनही जाहिरात मिळण्याची शक्यता मावळली. या पाश्र्वभूमीवर दिवाळी अंक प्रकाशित करण्याचे शिवधनुष्य पेलण्याची वेळ आली आहे, याकडे राठिवडेकर यांनी लक्ष वेधले.

गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा ३५ ते ४० टक्के जाहिराती कमी मिळाल्या. त्याचा फटका दिवळी अंकांना बसण्याची शक्यता ‘दिवा प्रतिष्ठान’चे विजय पाध्ये यांनी वर्तवली. एरवीच्या खर्चापेक्षा ५० टक्के कमी खर्चात अंक काढावा लागला. त्यासाठी रंगीत पानांची संख्या कमी करून कृष्णधवल करण्याकडे कल आहे. परिणामी बाजारात अंक उशिराने दाखल होतील, असे ‘तारांगण’चे संपादक मंदार जोशी यांनी सांगितले. दसऱ्यापासूनच दिवाळी अंकांचे बाजारपेठेमध्ये आगमन होते. परंतु अजून दिवाळी अंकांची छपाईच सुरू आहे.

वाङ्मयीन व्यवहार आतबट्टय़ाचाच

अभिजात वर्गापुरताच मर्यादित असलेला आपला वाङ्मयीन व्यवहार सदैव आतबट्टय़ाचाच असतो. त्यामुळे आर्थिक मंदी, निवडणुका आणि अन्य कोणत्याच गोष्टींचा परिणाम झाला असे म्हणता येत नाही, असे ‘पद्मगंधा’ दिवाळी अंकाचे संपादक अरुण जाखडे यांनी सांगितले. जाहिराती या व्यक्तिगत संबंधांतून किंवा उपद्रव मूल्यातून मिळतात. किती जाहिरातदार दिवाळी अंकाच्या गुणवत्तेवर जाहिरात देतात हा प्रश्न विचार करण्याजोगा आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. जाहिराती नसल्या तरी वाचकांना सकस मजकूर देण्यासाठी काम करणारे दिवाळी अंक प्रकाशित करण्याचे सातत्य ठेवणारे लोक व्यवसायामध्ये आहेत. इलेक्ट्रॉनिक माध्यमांनी आधी मराठीच्या वाचकांना आकर्षित केले. आता दिवाळी अंकांच्या जाहिरातीवर परिणाम केला आहे. अनेक आस्थापनांमध्ये प्रमुख पदावर मराठी माणसे नसल्यामुळे आणि त्यांना दिवाळी अंक म्हणजे काय हे माहीत नसण्याचा परिणाम दिवाळी अंकांना जाहिराती न मिळण्यावर झाला आहे, असे जाखडे यांनी सांगितले.

मंदीचाही फटका..  दिवाळी अंकांना मोठय़ा प्रमाणावर बांधकाम व्यावसायिक, गृहोपयोगी वस्तू, ज्वेलर्स, सहकारी बँका यांच्याकडून जाहिराती दिल्या जातात. तीन वर्षांपूर्वीचे निश्चलनीकरण, वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) आणि महारेरा कायद्यामुळे बांधकाम व्यवसायात आलेल्या मंदीचाही फटका दिवाळी अंकांना बसला आहे.

प्रकाशकांची पंचाईत..

दर वर्षी राजकीय नेते, पक्षांकडूनही मोठय़ा प्रमाणावर जाहिराती मिळतात. मात्र यंदा विधानसभा निवडणुकीच्या खर्चामुळे जाहिराती येण्याचे प्रमाण कमी झाले असल्याचे प्रकाशकांचे म्हणणे आहे. याशिवाय सरकारही दिवाळी अंकांना जाहिराती देते. परंतु, निवडणुकीमुळे सरकारकडून ऐनवेळी जाहिरात देण्यास नकार मिळाल्याने प्रकाशकांची मोठी पंचाईत झाली आहे.