भिवंडी येथील युनियन बँकेचे एटीएम सेंटर फोडून १५ लाख ६७ हजारांची रोकड चोरणाऱ्या चार जणांच्या टोळीला नारपोली पोलिसांनी ४८ तासांत अटक केली असून त्यांच्याकडून १५ लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे. त्यातील मुख्य आरोपी या बँकेच्या एटीएम सेंटरमध्ये पैसे भरणा करणाऱ्या खासगी एजन्सीमध्ये काम करत असल्यामुळे त्याला या एटीएम सेंटरचा पासवर्ड माहिती होता. त्यानेच तिघांच्या मदतीने ही चोरी केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.
विनायक मोहन विश्वासराव (२२), पांडुरंग देवराम बांगर (२३), आशीष राजेश माने (१९) आणि दीपक केशव शेलार (३५), अशी अटक करण्यात आलेल्या चौघांची नावे आहेत. हे सर्वजण भांडुप येथील टेंभीपाडा भागात राहतात. बँकेच्या एटीएम सेंटरमध्ये पैसे भरणा करण्याचे काम खासगी एजन्सीमार्फत करण्यात येते. अशाच एका एजन्सीमध्ये विनायक विश्वासराव काम करत होता.  महिनाभरापूर्वी त्याने काम सोडले होते. पण, बँकेने एटीएम सेंटरचा पासवर्ड बदलला नव्हता. त्याचाच फायदा घेत त्याने तीन साथीदारांच्या मदतीने दोन दिवसांपूर्वी एटीएम सेंटर फोडले. मात्र, पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी त्याने एटीएम सेंटरची तोडफोड केल्याचे भासविले होते, अशी माहिती ठाण्याचे अप्पर पोलीस आयुक्त हिम्मतराव देशभ्रतार यांनी दिली.  या चोरीप्रकरणी एटीएम सेंटरमधील सी. सी. टीव्ही फूटेज तपासण्यात आले होते. त्यात विश्वास कॅमेऱ्याची दिशा बदलताना दिसून आला. त्यानुसार, त्याला ताब्यात घेतले असता, हा गुन्हा उघडकीस आला.