गुढीपाडव्याच्या मेळाव्याला निघालेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे दिंडोशी येथील विभाग अध्यक्षावर मोटारसायकलवरुन आलेल्या तीन हल्लेखोरांनी चॉपर तलवारीने वार केल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी चारकोप येथे घडली. हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या विभाग अध्यक्षाला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून चारकोप पोलीस हल्लेखोरांचा शोध घेत आहेत.
मालाड पूर्व येथील कुरार व्हिलेज येथे राहणारे अरुण सुर्वे मनसेच्या दिंडोशी विभागाचे अध्यक्ष आहेत. शुक्रवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास सुर्वे शिवाजी पार्क येथे आयोजित गुढीपाडवा मेळाव्याला जाणार होते. त्यापूर्वी ते कांदिवली, चारकोप येथील स्वामी समर्थ मठात गेले होते. दर्शन घेऊन परतल्यानंतर कारच्या दिशेने जाताना मोटारसायकलवरुन आलेल्या तीन अनोळखी इसमांनी त्यांच्यावर चॉपर, तलवारीने हल्ला करुन पळ काढला. सुर्वेसोबत असलेल्या कार्यकर्त्यांनी त्यांना अंधेरीच्या कोकीलाबेन अंबानी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.