महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केलेल्या आंदोलनामुळे राज्यातील ६५ टोल नाके सरकारला बंद करावे लागले आहेत. या विषयावर मनसे न्यायालयात गेली असून मुख्यमंत्र्यांनाही भेटलो. सत्तरच्या दशकातील खलनायक वाटावे अशा मुख्यमंत्र्याना टोल नाके वसुलीमध्ये गडबड असल्याचे मान्य आहे पण ते हतबल आहेत. टोल कशासाठी घेतला जात आहे, तो किती वसुल केला गेला आहे, हे स्पष्ट होत नाही तोपर्यंत राज्यातील एकाही टोलनाक्यावर टोल भरु नका, टोल न भरल्यास आडवे येणाऱ्यांना तूडवून काढा, असा इशारा मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी रविवारी वाशी येथील एका सभेत दिला.
 पद्मश्री अलीकडे कोणालाही दिली जात असल्याबद्दल त्यांनी टिका केली. दाभोळकरांना मरणोत्तर पद्मश्री देण्याऐवजी त्यांच्या मारेकऱ्यांना पकडल्यास त्यांच्या आत्म्याला शांती लाभेल असे ते म्हणाले.
मनसेच्या नवी मुंबई वाशी सेक्टर २६ येथील मध्यवर्ती कार्यालयाचे उद्वघाटन ठाकरे यांच्या हस्ते रविवारी झाले.  राज्यात अजित पवार आणि कंपनीची दादागिरी वाढली असून आम्ही सभ्यपणाने बोलतो यांचा अर्थ आम्ही षंढ आहोत असा होत नाही. आघाडी सरकार आज प्रस्थापित आहे आणि आम्ही विस्थापित असलो तरी तुम्हाला घरात घुसून मारु. टोल वसुली करणाऱ्या रस्त्यावर शौचालये नाही. आमच्या आयाबहिणींनी  जायचे कुठे असा सवाल करुन मनसेच्या कार्यकर्त्यांनी लोकांची मने जिंकावीत, कार्यकर्त्यांच्या बोलण्यात स्पष्टवक्तेपणा असावा पण उद्वटपणा मी खपवून घेणार नाही असा इशारा दिला.