मातृत्व ही संकल्पना खूप महत्त्वाची आहे. मातृत्वभावना मनात जागण्यासाठी बाईने मुलाला जन्मच दिला पाहिजे, असे नाही. स्त्री आणि पुरुष दोघांनीही हे मातृत्व पोटातून वागवले पाहिजे. मातृत्वभावनेने वागणाऱ्या व्यक्तीच माणूस घडवतात, समाज घडवतात, प्रसंगी समाज बदलतातही, याचे भान स्त्रियांनीच नाही तर पुरुषांनीही जपले पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांनी केले.

समाजातील नानाविध क्षेत्रांत विलक्षण कामगिरी करणाऱ्या वर्तमानकाळातील दुर्गाचा सन्मान करणारा ‘लोकसत्ता दुर्गा २०२०’ हा पुरस्कार सोहळा शुक्रवारी पार पडला. नऊ दुर्गाच्या सन्मानाबरोबरच ‘दुर्गा जीवनगौरव पुरस्कार’ ज्येष्ठ दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांना प्रदान करण्यात आला. भावे यांनी माणसाचे माणसाशी माणुसकीने जोडले जाणे आणि निसर्गाशी एकरूप होण्याचे तत्त्व आजच्या काळात किती गरजेचे आहे हे यावेळी स्पष्ट केले.

ज्येष्ठ दिग्दर्शिका प्रतिमा कुलकर्णी यांनी भावे यांना विविध मुद्दय़ांवर बोलते केले. आई-वडिलांनी माणूस, धर्म, देव, जात या सगळ्या संकल्पनांकडे वेगळेपणाने पाहण्याचे संस्कार दिले. आई तिसरी शिकलेली, पण अतिशय बुद्धिमान, रसिक आणि तितकेच कलासक्त व्यक्तिमत्त्व असलेली होती. तर वडील त्याकाळी इंग्रजी आणि कायद्याची पदवी घेतलेले, अत्यंत सखोल वाचन करणारे होते. आम्ही पुण्याच्या पूर्व भागात राहात होतो, त्यामुळे ख्रिश्चन, तमिळी, ज्यू अशा विविध लोकांशी आमचे संबंध आले. आमच्याकडे कामाला येणारा मुस्लीम होता आणि तो घरी आल्यावर त्याला जेवण देऊन मगच आई जेवायची. जगण्याकडे पाहण्याची माझी दृष्टी वेगळी आहे, त्याचे श्रेय या संस्कारांना जाते, असे भावे यांनी सांगितले.

चित्रपट माध्यमातूनच व्यक्त होण्याची गरज वाटण्यामागचे कारणही त्यांनी या वेळी उलगडून सांगितले. चित्रपट हे माध्यम जगण्याच्या प्रतिमा उभे करते, प्रतिमा या शब्दाचा अर्थच मुळी जे दिसते आहे त्यापलीकडचा अर्थ शोधणे असा होतो. हा अर्थ चित्रपटांच्या माध्यमातून शोधण्याचा प्रयत्न आपण सातत्याने केला असल्याचे त्यांनी सांगितले. यासाठी अर्थकारणाचा विचार कधीच आडवा आला नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. मला जे चित्रपटातून मांडायचे आहे त्यासाठी पैसाअडका, प्रतिष्ठा, वेळ घालवण्याची माझी तयारी असते, त्याबाबतीत मी मनाने धीट आहे. जगायला खूप पैसे लागतात असे आपल्याला वाटत नाही, त्यामुळे आहे त्यात कलाकृती करण्याचा अट्टहास जपता आल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले.

‘महिलांच्या वावराला सगळीकडेच मर्यादा असतात. एखादे स्थान दिले गेले तरी ते नाममात्र असते. परंतु ‘लोकसत्ता’ याला कायमच अपवाद ठरला आहे. सदरांपासून ते सन्मानापर्यंत सगळीकडे स्त्रियांना महत्त्वाचे स्थान आहे. सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय, कला आणि इतर अनेक क्षेत्रांत सक्रिय कामगिरी करणाऱ्या या महिलांचे कर्तृत्व समोर आणणे गरजेचे आहे. विशेष म्हणजे एका कार्यात स्वत:ला झोकून देण्याचे काम या दुर्गा करत आहेत. अशा अज्ञात दुर्गाना प्रकाशात आणण्याचे काम या पुरस्कारामार्फत केले जात आहे,’ असे ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांनी सांगितले.

‘लोकसत्ता’च्या ‘फीचर एडिटर’ आरती कदम यांनी दुर्गाच्या शोधाचा प्रवास प्रस्तावनेत उलगडला. ‘वृत्तपत्रात केलेल्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून आलेल्या साडेतीनशेहून अधिक स्त्रियांच्या नामांकनातून नऊ जणींची निवड करण्यात आली. या निवड प्रक्रियेला नीलम गोऱ्हे, माजी कुलगुरू स्नेहलता देशमुख आणि ज्येष्ठ दिग्दर्शिका प्रतिमा कुलकर्णी परीक्षक म्हणून लाभल्या. यातून नऊ दुर्गा निवडल्या गेल्या असल्या तरी नामांकन पाठवलेल्या इतर साडेतीनशे दुर्गाचे कार्यही तितकेच महत्त्वाचे आहे,’ असे त्या म्हणाल्या.

दुर्गा पुरस्कारांच्या मानकरी ठरलेल्या नऊ जणींच्या कार्याचा आलेख अभिनेत्री मधुरा वेलणकर, देविका दफ्तरदार, पर्ण पेठे यांनी ओघवत्या शब्दांत वाचकांपुढे मांडला. या कार्यक्रमाला अभिनेत्री इरावती हर्षे, ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशेदेखील उपस्थित होते. कुणाल रेगे यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाचे संहिता लेखन चिन्मय पाटणकर आणि संपदा सोवनी यांनी केले.

आभासी माध्यमातूनही..

विविध क्षेत्रांत मोलाचे योगदान देणाऱ्या नऊ कर्तृत्ववान स्त्रियांचा गौरव ‘लोकसत्ता दुर्गा पुरस्कारा’च्या माध्यमातून केला जातो. यंदाचे पुरस्काराचे सातवे वर्ष होते. वाचक आणि रसिकांनी भरलेले सभागृह, टाळ्यांनी मिळणारी दाद, महिलांचे कर्तृत्व, कामगिरी पाहून पाणावलेले डोळे असे वातावरण यंदाच्या वर्षी करोनामुळे अनुभवता आले नसले तरी आभासी माध्यमातूनही वाचक जोडले गेले.

 मानकरी दुर्गा..

आदिवासी कुमारी मातांचा प्रश्न लावून धरणाऱ्या डॉ. लीला भेले, कलासंवर्धक मधुरा जोशी-शेळके, निराधार वृद्धांसाठी पुढाकार घेणाऱ्या डॉ. अपर्णा देशमुख, नेत्रहीन असूनही अनेक अडचणींवर मात करणाऱ्या साहाय्यक जिल्हाधिकारी प्रांजल पाटील, ग्रामीण भागात आरोग्याच्या क्षेत्रात काम करणाऱ्या स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. शुभांगी अहंकारी, पर्यावरण रक्षणाच्या क्षेत्रात ‘ब्राऊन लीफ’ या व्यासपीठामार्फत कार्यरत असलेल्या अदिती देवधर, वारली आदिवासींच्या चित्रांना वेगळी ओळख देणाऱ्या चित्रकार चित्रगंधा सुतार, स्त्रियांच्या शरीरसौष्ठव खेळात उत्तुंग कामगिरी केलेल्या स्नेहा कोकणेपाटील आणि कुपोषणमुक्तीसाठी मोलाचे योगदान देणाऱ्या रंजना करंदीकर यांना दुर्गा पुरस्काराने

आजवर लोकांसमोर आल्या नाहीत अशा सुमित्राताई उलगडण्याचा माझा मानस होता. हे स्तिमित करणारे व्यक्तिमत्त्व आहे याची आज जाणीव झाली. या कार्यक्रमानिमित्ताने झालेल्या गप्पा औपचारिकतेच्या पलीकडे जाणाऱ्या होत्या. मी दुर्गा पुरस्काराशी गेली अनेक वर्ष जोडली गेली आहे. यंदा परीक्षक म्हणून येताना मला अधिक आनंद झाला, पण ही खूप मोठी जबाबदारी होती हे मात्र नक्की.

– प्रतिमा कुलकर्णी,  ज्येष्ठ दिग्दर्शिका

निष्ठेने कोणत्याही वलयाविना आपले कार्य करत आहेत, अशा मंडळींना समाजापुढे आणण्याचे काम‘लोकसत्ता’च्या माध्यमातून होते. ज्या तीन दुर्गाचा परिचय मी करून दिला, तो वाचताना आपण माणूस म्हणून कायम जमिनीवर असायला हवं याची जाणीव होते. पुरस्काराने जबाबदारी वाढत असली तरी आपल्याला कुठे पोहोचायचे आहे याचेही भानही येते. हा सोहळा आत्मभान देणारा होता.

   – मधुरा वेलणकर, अभिनेत्री 

सुमित्रा भावे अत्यंत महत्त्वाच्या आणि द्रष्टय़ा दिग्दर्शिका आहेत. सातत्याने संवेदनशील कलाकृती निर्माण करणे हे प्रेरणादायी आहे. केवळ पुरस्कार मिळाले म्हणून नाही, तर त्यांचा प्रत्येक चित्रपट हा लोकांच्या मनावर दूरगामी परिणाम करणारा आहे. त्यांच्या चित्रपटात काम करून मी अभिनेत्री म्हणून अधिकच श्रीमंत झाले.

   – इरावती हर्षे, अभिनेत्री

सुमित्रा भावे यांच्याशी माझे केवळ दिग्दर्शक आणि अभिनेत्रीचे नाते नसून त्या माझ्यासाठी मैत्रीण, तत्त्वज्ञ, मार्गदर्शक सर्वकाही आहेत. त्यांच्या चित्रपटांतून आम्ही खूप घडलो, त्यांनी घडवले.

देविका दफ्तरदार, अभिनेत्री 

प्रवाहाविरुद्ध जाणे म्हणजे काय हे सुमित्राताईंनी उलगडून सांगितले. अशा वेळी ठामपणे कसे उभे राहावे हे त्यांच्याकडून प्रत्येकाने शिकावे. मराठी चित्रपटसृष्टीत त्या आहेत हे आपले भाग्य आहे. ‘ पुरस्कारा’साठी निवडल्या गेलेल्या दुर्गाचे काम थक्क करणारे आहे.

   – पर्ण पेठे, अभिनेत्री

 

प्रायोजक

* प्रस्तुती : ग्रॅव्हिटस फाऊंडेशन

* सहप्रायोजक : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ.

* पॉवर्ड बाय : इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लि., यश कार्स, राष्ट्रीय केमिकल्स अ‍ॅण्ड फर्टिलाइजर्स लि.